पुणे : शहरी गरीब कार्डसाठी धावपळ ; क्षेत्रीय स्तरावर सुविधा देण्याची नागरिकांची मागणी

पुणे : शहरी गरीब कार्डसाठी धावपळ ; क्षेत्रीय स्तरावर सुविधा देण्याची नागरिकांची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरी गरीब योजनेचे कार्ड देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. मात्र, ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करता येत नाही, त्यांना एकतर एजंट गाठावा लागतो किंवा महापालिका. त्यामुळे नागरिकांची कार्ड मिळविण्यासाठी धावपळ होत आहे. त्यामुळे कार्ड देण्याची सुविधा क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. महापालिकेकडून शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असणार्‍यांना घेता येतो. कार्डधारकांना शहरातील खासगी व महापालिकेच्या पॅनेलवरील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी एक लाखापर्यंत अर्थसाहाय्य मिळते, तर कॅन्सर रुग्णांसाठी दोन लाख रुपये दिले जातात.

योजनेचा गैरफायदा घेणार्‍यांना आळा घालण्यासाठी आणि योजनेत सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाने या योजनेचे डिजिटायजेशन करण्याचे काम हाती घेतले आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन केल्याने नागरिकांना स्वतःला कार्ड काढता येते. ज्यांना ही प्रक्रिया जमत नाही, त्यांच्यासाठी महापालिका भवनात कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यावर नागरिकांची मोठी गर्दी होते.

या गर्दीमुळे नागरिकांचा संपूर्ण दिवस येथेच जातो. दुसरीकडे, ही प्रक्रिया पूर्ण करून देणारे एजंटही कार्यरत झाले आहेत. या एजंटकडून नागरिकांची आर्थिक लुबाडणूक होते. त्यामुळे कार्ड काढण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ व एजंटकडून होणारी लूट थांबविण्यासाठी ही सुविधा महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

शहरी गरीब योजनेचे ऑनलाइन कार्ड देण्याची सुविधा केवळ महापालिकेत आहे. ज्यांना स्वतःला कार्ड काढता येत नाही, त्यांना एकतर एजंट गाठावा लागतो, नाहीतर महापालिकेत यावे लागते. त्यामुळे कार्ड काढण्याची सुविधा प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये करण्यात यावी.
                                                         – एजाज रहमान खान, येरवडा

कार्ड देण्याची प्रक्रिया ऑनलाइन केल्यामुळे अनेक गैरप्रकार उजेडात आले आहेत. खरी गरज असलेल्या नागरिकांना कार्ड मिळविताना अडचण येऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. कार्ड देण्याची सुविधा नागरिकांना त्यांच्या परिसरात मिळावी, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
                                    – रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news