नाशिक : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत ‘लेडिज फर्स्ट’ ; अवघ्या 76 पुरुषांकडून नसबंदी | पुढारी

नाशिक : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत 'लेडिज फर्स्ट' ; अवघ्या 76 पुरुषांकडून नसबंदी

नाशिक : गौरव अहिरे

‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना रुजली असून, अपत्य प्राप्तीनंतर अनेक दाम्पत्य कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून किंवा इतर मार्गांनी पाळणा लांबवण्यावर भर देतात. त्यानुसार मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०२३ या ५८ महिन्यांच्या कालावधीत जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, सामान्य व महिला रुग्णालयांमध्ये १७ हजार ७४७ जणांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यापैकी ०.४२ टक्के म्हणजेच अवघ्या ७६ पुरुषांनी कुटुंंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्या असून, उर्वरित १७ हजार ६७१ महिलांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे कुटुंब छोटे ठेवण्याचा भार महिलांवरच असल्याचे चित्र आहे.

पहिले मूल झाल्यानंतर दुसऱ्या बाळंतपणासाठी दाेन ते तीन वर्षांचे अंतर ठेवण्याकडे दाम्पत्यांचा कल असतो. त्यामुळे पहिली गर्भधारणा झाल्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, तांबी (कॉपर टी) बसवणे, गर्भनिरोधक गोळ्या, अंतरा इंजेक्शन किंवा निरोधचा वापर करून दुसरी गर्भधारणा लांबवण्यावर बहुतांश दाम्पत्यांचा भर असतो. तर अनेकदा ‘एक मूल सुंदर फूल’ या उक्तीनुसार पहिल्या बाळंतपणानंतर दुसरे मूल नको असल्यास कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्यांचाही संख्या वाढत आहे. त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा, सामान्य व महिला रुग्णालयांमध्ये एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०२३ या ५८ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ८७ हजार ७८५ जणांनी पाळणा लांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले आहेत. मात्र, यामध्ये पुरुषांचा वाटा अत्यल्प असून, पाळणा लांबवण्यासाठी पुरुषांचा सर्वाधिक भर निरोध वापरण्यावर दिसतो. मात्र, महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसह तांबी बसवणे, अंतरा इंजेक्शन घेणे किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेऊन पाळणा लांबवतात किंवा संतती होऊ नये यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतात. यासाठी गर्भवतींसह त्यांच्या नातलगांचे समुपदेशन केले जाते व त्यांना कुटुंब नियोजन केल्यास होणारे फायदे पटवून दिले जातात. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम होत असून, छोटे कुटुंब ठेवणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.

पाळणा लांबवण्यासाठी केलेले प्रयत्न

शस्त्रक्रिया/उपाययोजनांचे स्वरूप – उपाययोजना केलेल्या व्यक्ती

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया – १७,७४७

तांबी बसवणे- ३९,९३७

गर्भनिरोधक गोळ्या- २५,१५१

अंतरा इंजेक्शन- ४,९५०

इंजेक्शन घेण्याकडेही कल

महिलांनी बाळंतपणानंतर तांबी बसवल्यास काही वर्षांपर्यंत पाळणा लांबवला जातो. त्याचप्रमाणे जोपर्यंत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात तोपर्यंत दुसरे अपत्यप्राप्ती होत नाही. अंतरा इंजेक्शन घेतल्यास तीन महिन्यांपर्यंत गर्भधारणा होत नाही. त्यामुळे अंतरा इंजेक्शन घेण्याकडेही महिलांचा कल वाढत आहे.

हेही वाचा : 

Back to top button