सातारा : जिल्ह्याच्या भाजप-ठाकरे सेनेची सूत्रे गोरे बंधूंच्या हाती! | पुढारी

सातारा : जिल्ह्याच्या भाजप-ठाकरे सेनेची सूत्रे गोरे बंधूंच्या हाती!

म्हसवड : पुढारी वृत्तसेवा : जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आ. जयकुमार गोरे यांनी भाजपचा झंझावात निर्माण केला. वाडी-वस्तीवर भाजपचा बोलबाला सुरु झाला आहे. आ. गोरे यांचा वारु रोखण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आ. जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुखपदाची धुरा सोपवली आहे. एकप्रकारे परस्परविरोधी राजकीय पक्षांची जिल्ह्याची सूत्रे गोरे बंधूंकडे आली आहेत. त्यामुळे ‘आ देखे जरा किसमें कितना है दम’ अशी टस्सल भविष्यकाळात पहायला मिळणार आहे. पक्ष वाढीच्या या लढाईत कोण जिंकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आ. जयकुमार गोरे व शेखर गोरे या दोघा भावंडांनी सन 2007 साली एकत्र माणच्या राजकारणात प्रवेश केला. यावेळी तालुक्यावर स्व.सदाशिवराव पोळ तात्यांचे एकहाती वर्चस्व होते. या वर्चस्वाला शह देण्याचे काम याच गोरे बंधूनी करून दाखवले. त्यावेळी आ. जयकुमार गोरे व शेखर गोरे एकत्र होते. त्या काळात शेखर गोरे यांनी आ. जयकुमार गोरेंना साथ दिली होती. मात्र, नंतरच्या काळात दोन्ही भावडांत राजकीय वितुष्ट आल्याने दोघांनी राजकीय सवता सुभा मांडला. आ. गोरेंनी आमदारकी मिळाल्यानंतर मतदारसंघात विविध निधीतून विकासकामे केली. सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. तर दुसर्‍या बाजूला शेखर गोरे यांनीही कोणतीही सत्ता नसताना कोणताही निधी नसताना स्वखर्चातून गावोगावी, वाड्यावस्त्यांवर विविध विकासकामे केली. सन 2014, 2019 ला याच गोरे बंधूंनी समोरासमोर आमदारकीची निवडणूक लढवली. आ. जयकुमार गोरेंनी विधानसभा निवडणुका जिंकल्या. त्याचवेळी शेखर गोरेंनी स्थानिक निवडणुकांमध्ये वरचष्मा दाखवला.

आंधळी प्रकरणामुळे गोरे बंधूंची राजकीय दुश्मनी राज्यभर गाजली. जिल्हा बँकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत आ. गोरेंनी सोसायटी मतदरसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना विरोध करण्यासाठी शेखर गोरेंनी स्व. सदाशिवराव पोळ तात्यांना निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. यात आ. गोरेंनी बाजी मारून जिल्हा बँकेत प्रवेश करून विरोधकाची भूमिका बजावत बँकेच्या कामकाजाबाबत बँक प्रशासन व सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते. यावेळच्या जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेखर गोरेंनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने यावेळी दोन्ही गोरे बंधूच्यात समोरासमोर लढत होईल असे सर्वांना अपेक्षित होते. मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आ. गोरेंनी अनपेक्षितपणे निवडणुकीतून माघार घेतली. शेखर गोरे यांनी आपले कसब पणाला लावून निवडणूक जिंकत शिवसेनेचा संचालक म्हणून जिल्हा बँकेत प्रवेश केला.

स्व. पोळ तात्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी संपत चालली असताना तिला उभारी देत पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचे काम त्या काळात शेखर गोरेंनी केले होते. मात्र याची परतफेड करण्यापेक्षा जिल्हा बँकेत त्याच राष्ट्रवादीने ज्या स्व.पोळ तात्यांना मदत करणार्‍या शेखर गोरेंविरोधात पोळ तात्यांच्याच मुलाला उभा केले. आ. गोरे अन् राष्ट्रवादीचा उमेदवार एकत्र असतानाही एकट्या शेखर गोरेंनी जिल्हा बँकेची प्रतिष्ठेची निवडणूक जिंकत दोघांनाही चपराक देण्याचे काम करून दाखवले. याच शेखर गोरेंना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पद मिळाले आहे. आक्रमकता ही शेखर गोरे यांची जमेची बाजू असली तरी त्यांच्याकडून म्हणावा तसा वेळ दिला जात नसल्याचे दिसून येते. त्यांनी पूर्ण वेळ दिला तर नक्कीच मतदार संघासह जिल्ह्यात पक्षाची अजून ताकद वाढण्याची शक्यता आहे.

दोन्ही गोरे बंधूंची कार्य करण्याची आक्रमक शैली माणच्या जनतेसह त्यांच्या पक्षातील पक्षश्रेष्ठींनाही भारावून टाकणारी आहे. भाजपाने आ. जयकुमार गोरे यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात भाजपचा झंझावात उभा केला आहे. आ.जयकुमार गोरेंनी जिल्ह्यात विविध बैठका, शिबीरे घेऊन पक्ष, संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसर्‍या बाजूला राज्यात शिवसेनेवर मोठे संकट आले असताना अनेक मातब्बर पक्ष सोडून गेल्यानंतर साहेब आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत असे सांगत शेखर गोरेंनी जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी घेतली आहे. नुकतीच त्यांनीही पक्ष, संघटना वाढीसाठी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन विधानसभा, गट, गण निहाय बैठका लावण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही गोरे बंधूंनी आपापल्या पक्षाची जिल्ह्याची सूत्रे आपल्या हाती घेतल्याचे दिसून येत आहे. त्यातून टोकाचा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. आजपर्यंत जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेची ताकद नगण्य होती. मात्र आ.जयकुमार गोरेंनी आपल्या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या पिछेहाटीला सुरूवात करत आता जिल्ह्याची जबाबदारी घेतली आहे. शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले असले तरी आता ते शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेल्याने ठाकरे गट तसा एकटा पडला आहे. मात्र, जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढवण्याची जबाबदारी शेखर गोरे यांनी घेतल्याचे दिसून येते. शेखर गोरे पूर्ण वेळ देणार का?, महाविकास आघाडीबाबत त्यांची भूमिका काय राहणार? भाजपच्या विरोधात ते किती रान पेटवणार? आ. जयकुमार गोरे त्यांना प्रत्युत्तर देणार का? माण-खटावच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहणार? शेखर गोरेंना नवी जबाबदारी कशी पेलवणार? याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे

बोराटवाडीच्या गोरे बंधूंची चर्चा राज्यभर

राज्यात, जिल्ह्यात सत्ता कोणाची असली तरी माणच्या बोराटवाडीतल्या सर्वसामान्य कुटुंबातील या दोन गोरे बंधूनी मात्र आपल्या कर्तृत्वाच्या बळावर एकाने आमदारकीच्या माध्यमातून विधानभवनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला तर दुसर्‍याने स्वखर्चातून विविध विकासकामे करत धाडसी स्वभावामुळे जिल्हाभर, राज्यभर ओळख निर्माण केली. जिल्ह्याच्या राजकारणात पक्षाची सूत्र पेलण्यासाठी तोडीस तोड नेतृत्व देण्याचे दोन्ही पक्षाने केल्याने दोन्ही गोरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र नसले तरी यानिमित्ताने बोराटवाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Back to top button