धुळे मनपाला बदनाम करण्‍यासाठी सेनेचे आंदोलन : महापौर प्रदीप कर्पे | पुढारी

धुळे मनपाला बदनाम करण्‍यासाठी सेनेचे आंदोलन : महापौर प्रदीप कर्पे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेने महापालिकेच्या प्रवेशव्दारावर आंदोलन करण्याऐवजी राज्यातील त्यांच्या सरकारकडून धुळे शहराच्या‍ विकासासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करत मनपा भाजपाकडे असल्याने धुळे मनपाला बदनाम करण्यासाठी आंदोलन केले जात आहे, असा आरोप महापौर प्रदीप कर्पे यांनी आज केला. कचरा संकलन करणारा वॉटरग्रेसच्या ठेकेदाराने शिवसेनेच्या महानगरप्रमुखाला मोठया रकमा दिल्याचा खळबळजनक आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

धुळयात रस्त्यावरील खडडे आणि कचरा संकलनाच्या मुददयावरुन शिवसेनेने महानगरपालिकेच्या प्रवेशव्दारावर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनातून मनपा प्रशासनाने केलेल्या गैरप्रकाराचे आरोप केले जात आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज महापौर प्रदीप कर्पे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी माजी महापौर चंद्रकांत सोनार , उपमहापौर भगवान गवळी, सभापती राजेश पवार , नगरसेवक हिरामण गवळी आदी उपस्थित होते.

जनतेची दिशाभूल करण्याऐवजी निधी आणण्यासाठी आंदोलन करावे

यावेळी बोलताना महापौर कर्पे यांनी शिवसेनेवर तोफ डागली. धुळे शहरात पाणी योजना व भुयारी गटारीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. या विभागाला वारंवार सूचना करुन देखील ते या कामांकडे दुर्लक्ष करीत आहेत. ही यंत्रणा राज्यातील शासनाच्या नियंत्रणाखाली काम करते. त्यामुळे धुळयातील रस्त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाबरोबरच राज्यातील तीन पक्षांचे सरकार देखील जबाबदार आहे. त्यामुळे शिवसेनेने धुळे मनपाला बदनाम करुन जनतेची दिशाभूल करण्याऐवजी राज्यातील शासनाकडून शहर विकासासाठी निधी आणण्यासाठी आंदोलन करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

सरकारकडे पाठपुरावा करण्याची तयारी दाखवल्यास धुळे मनपातील सत्ताधारी भाजपा देखील त्यांच्या समवेत राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यासाठी जाण्यास तयार असल्याचे कर्पे यांनी सांगितले. महापौरपदाचे काम हाती घेतल्यानंतर आपण राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कचरा संकलन ठेक्यासंदर्भात सर्व माहिती मांडली आहे. वॉटरग्रेस कंपनीने धुळयात कराराप्रमाणे काम केले नाही. या कंपनीने आपण काम करु शकत नसल्याचे लिहुन दिल्याने त्यांचा ठेका संपवून नवीन कंपनीला काम देण्याची कार्यवाही करण्यात आली; पण राजकारण करणा-यांनी मंत्री स्तरावरुन नवीन ठेका देण्यास स्थगिती आणली. त्यामुळे मोठी समस्या झाली आहे, असेही ते म्‍हणाले.

शिवसेनेच्या महानगरप्रमुखाला वॉटरग्रेस कंपनीने मोठया रकमा :  कर्पेचा आराेप

आता कच-याच्या प्रश्नावरुन शिवसेना आरोप करीत आहे; पण शिवसेनेच्या महानगरप्रमुखाला वॉटरग्रेस कंपनीने मोठया रकमा दिल्या आहेत, असा आरोप देखील त्‍यांनी केला. या पदाधिकारीच्या बँक खात्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्‍यांनी केली.
धुळे महानगरपालिकेला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 कोटींचा निधी जाहीर केला; पण यातील 70 टक्के निधी आघाडी शासनाने अडवुन ठेवल्याने कामे रखडली आहेत. या निधीसाठी शिवसेनेने प्रयत्न करावेत, आव्हान त्यांनी दिले. धुळे मनपाने नवीन अर्थसंकल्पात देवपुरच्या विकासासाठी विशेष निधीची व्यवस्था केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचलं का ?

पहा व्‍हिडिओ :

Back to top button