जायकवाडी धरण ओव्हरफ्लो, पाणी संघर्ष टळणार! - पुढारी

जायकवाडी धरण ओव्हरफ्लो, पाणी संघर्ष टळणार!

अहमदनगर; दीपक ओहोळ

यंदाच्या पावसाळ्यात मुळा, भंडारदरा व निळवंडे ही मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. मांडओहळ, घाटशिळ, सीना व खैरी हे मध्यम प्रकल्प सुद्धा ओसंडून वाहू लागले आहेत. एक टीएमसी क्षमतेचा आढळा प्रकल्प 97.55 टक्के भरला आहे. विसापूर प्रकल्पात आजमितीस फक्त 22 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा हा प्रकल्प भरण्याची आशा धूसर झाली आहे. विसापूर वगळता सर्वच प्रकल्प भरले आहेत. सलग तीन वर्षांपासून पाण्याचा सुकाळ असल्यामुळे जनतेत आनंदाचे भरते आले आहे. नगर जिल्हा पुन्हा एकदा जलसमृद्ध झाला आहे. दरम्यान, यंदा मराठवाड्यातील जायकवाडी धरणही (Jayakwadi) ओव्हरफ्लो झाले आहे. नगर-नाशिकमधून जवळपास 35 टीएमसीहून अधिक पाणी जायकवाडी (Jayakwadi) येथे गेले आहे. त्यामुळे येत्या काळात नगर व मराठवाड्याचा पाणी संघर्ष टळणार आहे.

जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरुच आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचे नुकसान सुरु आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 566.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जवळपास 126.5 टक्के पावसाची नोंद झालेली आहे. या कालावधीत मुळा, भंडारदरा व निळवंडे ही मोठी धरणे भरली आहेत.

सीना, घाटशीळ, खैरी हे मध्यम प्रकल्पदेखील याच कालावधीत भरले आहेत. अकोले तालुक्यातील आढळा धरण भरण्यात जमा आहे. यामध्ये 1034 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपरवा 399 दशलक्ष घनफूट क्षमतेचा मांडओहळ प्रकल्प भरला आहे. पारनेर तालुक्यातील 905 दशलक्ष घनफूट क्षमतेचा विसापूर मध्यम प्रकल्प गेल्या वर्षी ओव्हरफ्लो झाला होता. यंदा मात्र या प्रकल्पात फक्त 224 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात पाऊसदेखील भरमसाठ झाला आहे. त्यामुळे नदी, नाले वाहून गावपातळीवरील छोटे मोठे तलाव ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भरले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भूजलपातळी कमी झालेली नाही. यंदादेखील ती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी कमालीची असणार आहे.

यंदा लहान- मोठ्या धरणांत एकूण 50 हजार 272 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगाम जोमात असणार आहे. सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यास डिसेंबर -जानेवारी महिन्यातच जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहाते. अद्यापही परतीचा पाऊस बाकी आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात पाण्याचाच सुकाळ आहे.

यंदा हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची गरज यावर्षी तरी भासणार नाही. सध्या नगर-नाशिकमधून ओव्हरफ्लोचे पाणी जात आहे. धरणातून सध्या 9432 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्याचाही पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात नगर-मराठवाड्याचा पाणी संघर्ष टळणार आहे.

हेह वाचलं का?

Back to top button