चिमुकलीच्या धाडसाने दरोड्याचा प्रयत्न फसला; जळगावच्या मुक्ताईनगरातील घटना | पुढारी

चिमुकलीच्या धाडसाने दरोड्याचा प्रयत्न फसला; जळगावच्या मुक्ताईनगरातील घटना

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

लहान मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र १० वर्षीय मुलीच्या धाडसामुळे दरोडेखोरांचा प्रयत्न फसल्याची घटना जळगाव शहरातील मुक्ताईनगर परिसरात उघडकीस आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील मुक्ताईनगरात एस.एम.आय.टी. महाविद्यालाजवळ ॲड सचिन देविदास पाटील (वय ४३) हे पत्नी विद्या पाटील व दहा वर्षीय मुलगी श्रुंगी या परिवारासह वास्तव्यास आहेत. सचिन पाटील व त्यांच्या पत्नी दोघेही नोकरीवर निघून गेले. दुपारी श्रुंगी ही शाळेतून परत आल्यानंतर घरी एकटीच होती. दुपारी २ वाजता काही अज्ञात दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घरी आले. त्यातील एकाने दरवाजा ठोठावला. लोखंडी ग्रिलींगच्या दरवाजाला आतून कुलूप लावलेले होते, आवाज ऐकून श्रुंगीने लाकडी दरवाजा उघडला. त्यातील एकाने पिण्यासाठी पाणी मागितले, अनोळखी वाटत असल्याने श्रुंगीने पाणी देण्यास नकार देत दरवाजा बंद केला.

दरोडेखोरांनी दिली दरवाजा तोडण्याची धमकी…

यानंतर दरोडेखोराने पाणी पाज नाहीतर दरवाजा तोडून आतमध्ये घुसेन अशी धमकी दिली. मात्र श्रुंगीने हिंमत दाखवून दरवाजा अजिबात उघडला नाही. तब्बल १५ मिनिटे दरोडेखोर दरवाजाजवळ थांबून होते, मात्र श्रुंगीने त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. खिडकीतून श्रुंगीला एका झाडाखाली असलेल्या रिक्षात आणखी चार ते पाच जण दिसले. अखेरपर्यंत श्रुंगीने कुठलाही प्रतिसाद न देता दरवाजा उघडला नाही, त्यानंतर दरोडेखोर आल्या मार्गाने निघून गेले.

पोलिसांकडून तपास सुरू

खिडकीतून श्रुंगीने शेजारच्यांना आवाज दिला, त्यामुळे शेजारी राहणारी महिला धावतच श्रुंगीकडे आली, महिलेला तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर श्रुंगीची आई-वडील घरी परतले. यावेळी श्रुंगीने तिच्यासोबत घडलेली सर्व हकिगत सांगितली. या घटनेमुळे त्यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी तातडीने रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. सचिन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रात्री १२ वाजता पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

हेही वाचा:

Back to top button