जिच्या हत्येसाठी बाप-भावाला झाली शिक्षा, ‘ती’ ९ वर्षांनी घरी परतली! मग ‘तो’ हाडांचा सांगडा कोणाचा? | पुढारी

जिच्या हत्येसाठी बाप-भावाला झाली शिक्षा, 'ती' ९ वर्षांनी घरी परतली! मग 'तो' हाडांचा सांगडा कोणाचा?

नागपूर : पुढारी वृत्तसेवा; अल्पवयीन मुलगी एक दिवस अचानक घरातून बेपत्ता झाली. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार बाप आणि भावानेच तिचा खून केला. याच आरोपांखाली त्यांना अटक करण्यात आली व पुढे जेलही झाली. वडील एका वर्षाची शिक्षा भोगून घरी परतले. भाऊ अजूनही कारागृहातच आहे. दुसरीकडे ही बेपत्ता मुलगी तब्बल ९ वर्षांनी घरी परतली, तीसुद्धा लग्न झालेली अन अगदी सुखरूप. तिला बघून साऱ्यांनाच धक्का बसला. काही वेळ काय सुरू ते कुणालाच कळत नव्हते.

हा एखाद्या चित्रपटाला शोभावा असा संपूर्ण घटनाक्रम मध्य प्रदेशच्या टोकावरचा आणि नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या छिंदवाडा जिल्ह्यातला. या प्रकारानंतर आता पोलिसांच्या भूमिकेकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. बाप- लेकाने जेलमध्ये घालविलेला वेळ परत येणार कसा, त्याची भरपाई होणार कशी? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

छिंदवाड्याच्या जोपनाला गावातील रहिवासी शन्न उइके यांची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी २०१४ मध्ये अचानक घरातून बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी सर्वत्र तिचा शोधही घेतला. परंतु, ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. या घटनेच्या ७ वर्षांनी पोलिसांनी शन्न उइकेच्या घराजवळ खोदकाम केले. त्यात हाडांचा सांगाडा आणि बांगड्या मिळाल्या. या प्रकरणी पोलिसांनी बेपत्ता युवतीचा भाऊ सोनूवर हत्येचा आरोप ठेवला. तर वडिलांनी त्याला मृतदेह दफन करण्यास मदत केली असल्याचा पोलिसांचा दावा होता.

विशेष म्हणजे सुनावणीचे वेळी बाप-लेकानेही हत्येची कबुली दिली. त्यामुळे न्यायालयाने दोघांना शिक्षा सुनावली. १ वर्षांनी बापाला जामीन मिळाला. पण सोनू अद्याप जेलमध्येच आहे. आता बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी पुन्हा जिवंत घरी आली. दरम्यानच्या काळात तिचे लग्नही झाले. इतक्या वर्षांनी मृत असलेली मुलगी गावात जिंवत समोर आल्याने गावकरीही हादरले. मुलीला पाहून आई बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. या प्रकरणात पोलिसांनी बाप-लेकावर दबाव टाकून हत्येचा गुन्हा कबूल करून घेतला.

पोलिस अधिकाऱ्याने गुन्हा रद्द करण्यासाठी २ लाख रुपये मागितले. आम्ही १२१ हेल्पलाईनवर कॉल केला. पण मदत मिळाली नाही. त्यामुळे मला आणि मुलाला जेलमध्ये जावे लागले. मी जामीनावर बाहेर आलो. मात्र मुलगा अजूनही जेलमध्ये असल्याचे वडिलांनी सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button