नाशिक : भुताने खाल्ले म्हणून … आठ कुटुंबाने गावच सोडले | पुढारी

नाशिक : भुताने खाल्ले म्हणून ... आठ कुटुंबाने गावच सोडले

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागात अजूनही अनेकदा डोके बधिर करणार्‍या अंधश्रध्दांचे प्रकार पुन्हा पुन्हा उघड होत आहेत. तालुक्यातील धारगाव येथील भोरवाडी आदिवासी पाड्यावर लहान बालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला भुताने खाल्ले या अंधश्रध्देतून एका कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून आठ कुटुंबांनी गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतर सुरू केले आहे.

जानेवारीत या पाड्यावर आजारी बालकाचा मृत्यू झाला. या बालकाला भुताळपण करून खाल्ले असा आरोप करून संबंधित कुटुंबाने अन्य आठ कुटुंबांची झोप उडवून टाकली. यामुळे रोजच भांडणे होऊन वाद विकोपाला पोहोचले. अगदी घोटी पोलिसांपर्यंत तक्रार गेल्यानंतर सर्व संबंधित व्यक्तींना समोर बसवून पोलिसांनी गैरसमज दूर केले होते. मात्र तरीही या आठ आदिवासी कुटुंबाचा ससेमिरा काही थांबलाच नाही. यामुळे रोजचीच भांडणे, शिवीगाळाला सर्वजण कंटाळले आणि अखेर या आठ कुटुंबांनी घरांची मोडतोड करत सर्व साहित्यासह स्थलांतराला सुरुवात केली आहे. भोरवाडी पाड्यातील लक्ष्मण धापटे, सोमा शिद, भाऊ पादिर, सनू पादिर, गंगूबाई खडके, शांताराम खडके आणि अन्य दोन अशा आठ कुटुंबाने गाव सोडून स्थलांतर सुरू केले आहे. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे.

हेही वाचा:

Back to top button