पुणे : कुमारकोशाचे दोन खंड सहा महिन्यांत | पुढारी

पुणे : कुमारकोशाचे दोन खंड सहा महिन्यांत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाच्या वतीने ‘कुमारकोश’चे काम पूर्णत्वाकडे आले आहे. सहा महिन्यांत कोशाचे दोन खंड प्रकाशित होणार आहेत. त्याचप्रमाणे विश्वकोशाच्या द्वितीय आवृत्तीचे कामही गतीने सुरू असून, ऑलिंपिककोशाच्या निर्मितीलाही गती मिळाली आहे. त्यासोबत ’बालकोशा’च्या निर्मितीचे नियोजन करण्यात येणार आहे. नवीन वर्षात मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध प्रकल्पांच्या कामाला गती मिळाली असून, वर्षभरात विश्वकोशावर आधारित माहितीपुस्तक प्रकाशित होणार आहे. भाषा आणि वित्त विभागाकडून करण्यात येणार्‍या प्रशासकीय आणि वित्तीय अडवणुकीमुळे मध्यंतरी डॉ. राजा दीक्षित यांनी राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण, मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी आश्वस्त केल्यानंतर डॉ. दीक्षित यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा प्रकरणावर पडदा पडल्यानंतर विश्वकोशनिर्मिती मंडळाच्या विविध उपक्रमांना गती मिळाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. दीक्षित यांनी विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

डॉ. दीक्षित म्हणाले की, कुमारकोशाचे एकूण बारा मोठे खंड तयार करण्यात येणार आहेत. त्यातील कुमारकोशाच्या ’जीवसृष्टी आणि पर्यावरण’ या मोठ्या खंडांतर्गत दोन खंड पूर्वी प्रकाशित झाले आहेत. पुढील दोन खंड सहा महिन्यांत प्रकाशित होतील, या टप्प्यापर्यंत कोशाचे काम आले आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयाचा व्याप मोठा असल्याने त्याला अनुसरूनच पुढील दोन खंड प्रकाशित होणार आहेत. एकूण चार खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयावर असतील. होमी भाभा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन यांचे आम्ही या खंडांसाठी सहकार्य घेत आहोत. दोन्ही खंड संकेतस्थळावर आणि छापील स्वरूपातही प्रकाशित होतील. याबरोबरच विश्वकोशाची पहिली आवृत्ती 21 खंडांच्या रूपाने आधीच प्रकाशित झाली आहे. मूळ विश्वकोशाच्या विस्तरित द्वितीय आवृत्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. विश्वकोशावर आधारित येत्या वर्षभरात माहितीपुस्तकही प्रकाशित करणार आहोत.
लहान मुलांसाठी बालकोशाच्या निर्मितीचेही नियोजन करण्याचे प्रस्तावित आहे. बालसाहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञांशी चर्चा करून त्याचे नियोजन करणार आहोत.

मंडळाच्या कार्यालयासाठी जागा
सातारा येथील वाई येथे मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी मंडळाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. येथे मंडळाच्या नवीन कार्यालयासह तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्मारक असणार आहे. येथे अतिथी निवास, ग्रंथालय, बैठकांसाठी सभागृहही असणार आहे, असे डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले.

Back to top button