नाशिक : गाेल्डमॅन पारखला आठ दिवसांची पोलिस काेठडी, 22 कोटींचा अपहार | पुढारी

नाशिक : गाेल्डमॅन पारखला आठ दिवसांची पोलिस काेठडी, 22 कोटींचा अपहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यभर गाजलेल्या कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या २२ कोटींच्या अपहाराप्रकरणी पतसंस्थेचे संस्थापक संचालक तथा येवल्याचे माजी नगराध्यक्ष संशयित पंकज सुभाष पारख यांना गुरुवारी (दि.२) मध्यरात्री तिडके कॉलनीतून ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या होत्या. शुक्रवारी (दि.३) संशयित पारख यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

येवला येथील कै. सुभाषचंद्र पारख पतसंस्थेने ११ हजार ३२६ ठेवीदारांकडून ७० कोटींच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. तत्कालीन संचालक मंडळासह अध्यक्ष व व्यवस्थापकांनी नियमबाह्य कर्जवाटप केल्याने वसुलीचा प्रश्न निर्माण झाला होता. ठेवी परत न मिळाल्याने ठेवीदारांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन २६ ऑगस्ट २०२१ रोजी पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर पतसंस्थेवर प्रशासक म्हणून सहायक निबंधक प्रताप पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली होती. पाडवी यांच्या चौकशीत १ एप्रिल २०१५ ते २१ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते.

अखेर सहायक निबंधक प्रताप पाडवी यांच्या फिर्यादीवर २२ नोव्हेंबर २०२१ रोजी येवला शहर पोलिसांत संस्थापक पंकज पारख, अध्यक्ष योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि चार वसुली अधिकाऱ्यांसह १० संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पारख पोलिसांना गुंगारा देत होते. नाशिक शहरात ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) पारखच्या मुसक्या आवळल्या. तर संशयित सोनी व जैन यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button