Peshawar : पठाणांचे शहर दहशतवादाचा गड! इम्रान खान संशयाच्या भोवर्‍यात

Peshawar : पठाणांचे शहर दहशतवादाचा गड! इम्रान खान संशयाच्या भोवर्‍यात

पेशावर; वृत्तसंस्था : पाकिस्तानातील पेशावर (Peshawar) हे पठाणांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या बॉलीवूड स्टार शाहरुख खान याचे वडील याच भागातले. खैबरपख्तुनखाँची ही राजधानी आता पाकिस्तानातील दहशतवादाचा गड बनला आहे. पेशावर पोलिस वसाहतीतील मशिदीत आत्मघातकी स्फोट घडवून 90 वर पोलिस कर्मचार्‍यांसह शंभरवर जणांची हत्या करण्यात आली. तहरिक-ए-तालिबानमधील एका गटाने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. याआधीही पेशावरमध्येच एका शाळेवर दहशतवादी हल्ला करून तहरिक-ए-तालिबान या संघटनेने 141 शाळकरी मुलामुलींसह 148 जणांची हत्या केली होती.

दोन्ही हल्ल्यांत मरणारे सगळे मुस्लिमच होते. शाळेवरील हल्ल्यात मरण पावलेली बहुतांश मुले ही लष्करी अधिकारी, कर्मचार्‍यांची होती, तर मशिदीतील ताज्या आत्मघातकी स्फोटात मरणारे 90 वर लोक हे पोलिस होते. मारेकरी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) मात्र त्यांना मुस्लिम मानत नाही. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या मते सध्याचा पाकिस्तान हा अर्धाच मुस्लिम आहे आणि त्याच्या यंत्रणेतील घटक हेदेखील तसेच आहेत. मलाला युसुफझाई (नोबेल पुरस्कार विजेती) या शाळकरी मुलीवरही टीटीपीनेच हल्ला केला होता. अफगाण तालिबानप्रमाणेच पाकिस्तान तालिबानचाही मुलींच्या शिक्षणाला विरोध आहे. (Peshawar)

शुक्रवारचे पाकिस्तान (Peshawar)

  • पेशावरमधील स्फोटानंतर पाक पोलिस आणि टीटीपीच्या दहशतवाद्यांमध्ये खैबरपख्तुनख्वाँ प्रांतात शुक्रवारी ठिकठिकाणी झालेल्या चकमकींत 5 दहशतवादी ठार झाले.
  • पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने निवडणुका लांबविण्यासाठी पेशावर मशिदीत स्फोट घडवून आणल्याची चर्चा होताच पोलिसांमध्ये लष्कर आणि आयएसआयविरोधात बंडाचे सूर निघू लागले आहेत.

मुजाहिद्दीन आम्हीच निर्मिले आणि आज आम्ही त्याची शिक्षा भोगत आहोत. देश म्हणून दहशतवादाची बिजे आम्हीच पेरलेली आहेत. विषवल्ली आता संपूर्ण देशात पसरली आहे.
राणा सनाउल्लाह खान, अंतर्गत व्यवहार मंत्री, पाकिस्तान

मशीद स्फोटाबाबत सवाल…

  • पोलिस वसाहतीतील ही मशीद रेड झोनमध्ये येते. असे असताना तो विनामदत हल्लेखोर तेथे पोहोचलाच कसा? तीन टप्प्यांतील तपासणीतून स्फोटके निसटलीच कशी?
  • मुख्य म्हणजे तहरिक-ए-तालिबानची ताकद इतकी वाढलीच कशी? माजी पंतप्रधान इम्रान खान यांची यंत्रणा तर त्यामागे नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. (Peshawar)

तालिबान्यांमागे इम्रान खान

  • 15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता बळकावली तेव्हा अफगाणिस्तानातील गुलामीच्या बेड्या आज निखळून पडल्या, अशी स्वागतपर प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली होती. अवघे जग सावध झाले असताना इम्रान बेदरकारपणे तालिबानची तळी उचलून धरत होते.
  • पेशावर स्फोटानंतर सोमवारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदाराने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या शौकत खानम रुग्णालयात तालिबानी दहशतवाद्यांवर उपचार केले जातात, असा आरोप केला होता. सत्तेतील पुनरागमनासाठी इम्रान पाकला आगीच्या खाईत लोटत आहेत.
  • इम्रान खान पंतप्रधान असताना टीटीपीशी सीजफायर (शस्त्रबंदी) करार सरकारने केला होता. करारानंतर 9 महिने कुठलाही दहशतवादी हल्ला टीटीपीकडून झाला नव्हता. 21 नोव्हेंबर 2021 रोजी सरकारने विविध कारागृहांत असलेल्या टीटीपीच्या शंभरावर दहशतवाद्यांना रातोरात सोडून दिले होते.
  • पाकमधील विविध राज्यांत सामान्य नागरिक म्हणून तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या हजारो दहशतवाद्यांचे पुनर्वसन करण्याची माझी योजना होती; पण या योजनेला राज्यांकडून संमती मिळाली नाही, असे स्वत: माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीच मान्य केलेले आहे.

टीटीपीची ताकद वाढली

  • बलुच बंडखोरही आता टीटीपीला येऊन मिळाले.
  • अफगाण तालिबानचाही टीटीपीला संपूर्ण पाठिंबा आहे.

…तर दहशतवाद्यांच्या हाती अणुबॉम्ब

पाकिस्तानी लष्करातही टीटीपीचे समर्थक आहेत. अफगाणिस्तानमध्ये सध्या आहे त्याच धर्तीवर पाकमध्येही संपूर्ण इस्लामिक राजवट आणि शरियती निजाम प्रस्थापित व्हावा, या विचाराचे लष्करातील हे लोक आहेत. अशा लोकांचे लष्करात असणे म्हणजेच दहशतवाद्यांच्या हाती अणुबॉम्ब लागण्याची शक्यता बळावणे होय, अशा थेट शब्दांत अमेरिकेने पाकिस्तानला सतर्क केले आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news