कोयना धरणात उपयुक्त पाणीसाठा अवघा 15.85 टीएमसी

कोयना धरणात उपयुक्त पाणीसाठा अवघा 15.85 टीएमसी

पाटण, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची वरदायिनी कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षपूर्तीला आता अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. धरणात सध्या 20.97 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील 15.85 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे.

जून महिन्यात अपेक्षित पावसाची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे, तर ऐन उन्हाळ्यात धरणात अवकाळीच्या काळात जवळपास दीडशे मिलिमीटरचा टप्पा पावसाने पूर्ण केला आहे. परंतु, या काळात झालेला पाऊस व पडलेले पाणी हे पूर्णपणे धरणांतर्गत विभागातील जमिनीत मुरल्याने त्याचा धरणातील पाणीसाठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. स्वाभाविकच, 1 जूनपासून सुरू होणार्‍या नव्या तांत्रिक जलवर्षाला धरणात सरासरी 15 ते 17 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे.

यावर्षी सिंचनाचा प्राधान्यक्रम लक्षात घेता, पश्चिम वीजनिर्मितीच्या आरक्षित 67.50 टीएमसी पाणी कोट्याला जवळपास 10 टीएमसी पाण्याला आपोआपच कात्री लागली आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्याच्या मोजमापासाठी 1 जून हा दिवस तांत्रिक वर्षाची सुरुवात मानली जाते. त्यामुळे 1 जून 2023 पासून सुरू झालेल्या या तांत्रिक जलवर्षात कोयनानगर येथे 4,060 मिलिमीटर, नवजा 5,642 मिलिमीटर, महाबळेश्वर 5,451 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी 1 जूनला नव्या तांत्रिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी धरणात 18 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.

वर्षभरात आतापर्यंत धरणात 112.63 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. विविध कारणांसाठी पाणी वापरानंतर सध्या धरणात 20.97 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी उपयुक्त 15.82 टीएमसी पाण्यावरच यापुढील काळात चांगल्या पावसाळ्यापर्यंत आगामी पश्चिम वीजनिर्मितीसह सिंचनाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news