मान्सून अरबी समुद्रात दाखल | पुढारी

मान्सून अरबी समुद्रात दाखल

पुणे, पुढारी वृत्तसेवा : नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची पहिली शाखा मंगळवारी (दि. 28) दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाली. दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांत आगामी 72 तासांत येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, ‘रेमल’ चक्रीवादळ बांगला देशात गेले असून, ते शमण्याच्या स्थितीत आहे.

‘रेमल’ चक्रीवादळामुळे मान्सूनची दुसरी शाखा बंगालच्या उपसागराकडून पूर्वोत्तर राज्यांकडे अचानक वेगाने सक्रिय झाली. त्या शाखेने पश्चिम बंगालसह आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश या पूर्वोत्तर राज्यांत, तर अरबी समुद्रामार्गे केरळमध्ये आगामी 72 तासांत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे 31 मे ते 1 जून या काळात मान्सून या दोन्ही शाखांनी देशात प्रवेश करतोय.

‘रेमल’चा वेग मंदावला

पश्चिम बंगालमध्ये मोठी नासधूस करीत ‘रेमल’ चक्रीवादळ बांगला देशकडे सरकले आहे. त्याचा वेगही ताशी 16 कि.मी. इतका कमी झाला आहे. सध्या ते बांगला देशच्या उत्तरेस सुमारे 90 कि.मी. अंतरावर आहे. बुधवारपर्यंत ते पूर्णपणे शमण्याची शक्यता आहे.

Back to top button