‘अलमट्टी’ विसर्गाबाबत योग्य समन्वय ठेवा : मुख्यमंत्री | पुढारी

‘अलमट्टी’ विसर्गाबाबत योग्य समन्वय ठेवा : मुख्यमंत्री

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत योग्य समन्वय ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी प्रशासनाला दिल्या. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत दक्षता घ्या. गरज भासली आणि निवारा केंद्र उभे करण्याची वेळ आली, तर त्याचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करा, असेही शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत राज्यातील सीमावर्ती भागात पूरस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अलमट्टी धरणावर दरवर्षी अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाते. त्याप्रमाणे यावर्षी एक जूनपासूनच त्या धरणावर अधिकारी नियुक्त करा. अलमट्टी विसर्ग योग्य पद्धतीने झाला पाहिजे, याकरिता संबंधित अधिकारी आणि प्रशासनाशी सातत्याने आणि योग्य समन्वय ठेवा.

पूरस्थितीत आरोग्य सुविधांवर भर द्या, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पूरस्थिती निर्माण झाली, तर औषधे आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होणार नाहीत, अशी वेळ येणार नाही याची दक्षता घ्या. त्यानुसार आतापासूनच नियोजन करा. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आणि नागरिकांना स्थलांतरित करावे लागले, तर त्यांच्याकरिता उभारण्यात येणार्‍या निवारा केंद्रांवर विशेष लक्ष द्या. त्याचे सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे सचिव, सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींसह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते.

Back to top button