नाशिक : खानगाव नजीक बनतेय मिरची हब… अडीच वर्षांत 30 कोटींची विक्रमी उलाढाल | पुढारी

नाशिक : खानगाव नजीक बनतेय मिरची हब... अडीच वर्षांत 30 कोटींची विक्रमी उलाढाल

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
कांदानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याबरोबर आता भाजीपाला क्षेत्रातील मिरचीसाठी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आकर्षित करत. कांद्याच्या उत्कृष्ट चवीबरोबर आता मिरचीच्या ठसका म्हणून आपली नवीन ओळख निर्माण करत आहे. अवघ्या अडीच वर्षांत मिरचीने 30 कोटी 15 लाखांची उलाढाल केली असून, यातून बाजार समितीला 30 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

लासलगाव बाजार समितीने उपबाजार असलेल्या खानगाव नजीक येथे सुरुवातीला द्राक्षमणी लिलाव सुरू केले, त्यानंतर मागील दोन ते अडीच वर्षांपासून भाजीपाला मिरचीचे लिलावास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने दोन वर्षांत या उपबाजार समितीच्या आवारावर तब्बल 30 कोटी 15 लाख एवढी उलाढाल झाली आहे. यातून बाजार समितीला 25 ते 30 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. लासलगाव-पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील खानगाव नजीक हे प्रामुख्याने चांदवड व निफाड तालुक्याला जोडणारे प्रमुख गाव असून, यात प्रामुख्याने वडाळीभोई, पिंपळद, भोयेगाव, वडनेर भैरव, कानमंडाळे, उगाव, रानवड, वनसगाव, सावरगाव, नांदुर्डी, सारोळे खुर्द यांच्यासह परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतमालाला या आवारात चांगले भाव मिळत असल्याने पहिली पसंती मिळत आहे. बाजार समितीच्या आवारावर प्रामुख्याने हिरव्या मिरचीसाठी बलराम, शिमला मिरचीसाठी ज्वाला आदी जातीचे वाण मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे त्यामुळे येणार्‍या दिवसात लासलगाव बाजार समितीचे उपबाजार असलेले खानगाव नजीक हे मिरची हब म्हणून नावारूपास येईल, अशी अपेक्षा आहे.

द्राक्षमण्यांसाठी सुरू केलेल्या या बाजार समितीच्या आवारावर अडीच वर्षांत भाजीपाल्यासह मिरचीचे लिलाव सुरू झाल्याने शेतकरी, व्यापारी यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे लवकरच शासकीय दरात मोठी जागा खरेदी करून या जागेत भुसार व तेलबिया यांचे लिलाव लवकरच सुरू करण्याचा बाजार समितीचा मानस आहे. – सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.

हेही वाचा:

Back to top button