बेळगाव : हिंदू राष्ट्रसेनेच्या रवी कोकितकरांसह दोघांवर गोळीबार | पुढारी

बेळगाव : हिंदू राष्ट्रसेनेच्या रवी कोकितकरांसह दोघांवर गोळीबार

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : हिंदू राष्ट्रसेनेचे उत्तर कर्नाटक विभागाचे अध्यक्ष व हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य रवी कोकितकर (वय 45, रा. हिंडलगा) यांच्यावर गोळीबार झाला. यामध्ये त्यांचा कार्यकर्ता व वाहनचालक मनोज देसूरकर (वय 28, रा. बेनकनहळ्ळी) हा तरुण देखील जखमी झाला. शनिवारी रात्री आठच्या सुमारास हिंडलगा येथील मुख्य रस्त्यावरील मराठी शाळेच्या क्रॉसजवळ शनिवारी रात्री 7.45 वा. ही घटना घडली.

मास्क घालून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते. रवी कोकितकर स्कॉर्पिओमधून आल्यानंतर येथील गतिरोधकाजवळ त्यांचे वाहन सावकाश झाले. यावेळी गाडीच्या काचा खाली असताना हल्लेखोरांनी फायरिंग केले. यामध्ये एक गोळी कोकितकर यांच्या हनुवटीला लागून गेली, तर दुसरी गोळी मनोज देसूरकर याच्या दंडाला लागली आहे. हिंदू राष्ट्रसेना व श्रीराम सेना यांची विराट हिंदू सभा रविवारी बेळगावातील महाद्वार रोडवरील धर्मवीर संभाजी उद्यान येथे होणार आहे. याच्या तयारीसाठी रवी कोकितकर व त्यांचे सहकारी फिरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून याची तयारी सुरू असून शनिवारी दिवसभर फिरून ते हिंडलग्याला निघाले होते.

हल्लेखोर दबा धरून

दिवसभर फिरून झाल्यानंतर रात्री 7.45 च्या सुमारास कोकितकर, त्यांचा सहकारी चालक मनोज व अन्य पाच-सहा तरुण स्कॉर्पिओमधून हिंडलग्याला निघाले होते. मराठी शाळेजवळ तिघे हल्लेखोर आधीच दबा धरून थांबल्याचा संशय आहे. कोकितकरांचे वाहन मराठी शाळेजवळील क्रॉसवर आले तेव्हा येथे गतिरोधक असल्याने ते सावकाश झाले. यावेळी कारच्या काचा देखील खाली होत्या. ही संधी साधून हल्लेखोरांनी वाहनात गोळ्या झाडल्या. चालकाच्या बाजूलाच समोर बसलेल्या कोकितकरांवर आडवी झाडलेली एक गोळी त्यांच्या हनुवटीला चाटून गेली, तर दुसरी गोळी चालक मनोज याच्या दंडाला लागली. यानंतर हल्लेखोर एकाच दुचाकीवरून पसार झाले. प्रारंभी दोघांना जिल्हा रूग्णालयात नेले. परंतु, जखम गंभीर असल्याने त्यांना केएलईला हलवले आहे. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मास्कधारी हल्लेखोर

हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. कारण, हे मास्कधारी तरुण बराच वेळ मराठी शाळेजवळील क्रॉसवर थांबून होते. कोकितकरांचे वाहन येत असल्याची टिप त्यांना बहुदा आधीच मिळालेली असावी. त्यामुळे ते गतिरोधकाजवळच थांबून होते. वाहन येताच त्यांनी गोळीबार केला आहे. या तिघांनीही मास्क घातला होता, तर एकाच दुचाकीवरून आले होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रविंद्र गडादी, ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश, कॅम्पचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी, वडगावचे निरीक्षक श्रीनिवास हंडा, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी दाखल झाले. घटना घडलेल्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button