पुणे : कोयता गँगची कुंडली तयार करा : पोलिस आयुक्त रितेश कुमार | पुढारी

पुणे : कोयता गँगची कुंडली तयार करा : पोलिस आयुक्त रितेश कुमार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुंड कारागृहात बंद असताना, भुरट्या गुन्हेगारांनी मात्र पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून भररस्त्यात कोयते उगारुन दहशत पसरवणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी आयुक्तालयात झालेल्या आढावा बैठकीत (डब्लूआरएम) दिले. शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बैठक पोलिस आयुक्तालयात पार पडली. दहशत पसरवणार्‍याविरोधात कारवाईसाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्याची बाब पोलिसांनी गांभीर्याने घेतली असून, अशा सराईतावर कठोर कारवाईचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का), झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए)नुसार कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.
काय म्हणाले पोलिस आयुक्त? ‘गेल्या पाच ते सहा वर्षांत दहशत माजविणार्‍या गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. अशा मुलांवर कारवाई करण्यात मर्यादा येतात. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यातील तरतुदींचा आधार घेण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांच्या विरोधात तरतुदींचा आधार घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.  अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण आहे. त्यांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. कारवाई आणि समुपदेशनाच्या माध्यमातून अशा घटना रोखता येणे शक्य होईल. येत्या दोन ते तीन महिन्यांत याचे दृश्य परिणाम पाहायला मिळतील, असे ते म्हणाले.

Back to top button