नाशिक : सावाना सभासदांना आता एसएमएसद्वारे मिळणार पुस्तकांची माहिती  | पुढारी

नाशिक : सावाना सभासदांना आता एसएमएसद्वारे मिळणार पुस्तकांची माहिती 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक वाचनालयाच्या वाचक सभासदांना सर्व पुस्तकांची माहिती आता एसएमएसद्वारे मिळणार आहे. या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

१८२ वर्षांची परंपरा असलेल्या नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयाने काळानुसार बदलून आधुनिक गोष्टी आत्मसात करून आधुनिकीकरणाकडे पहिले पाऊल टाकले आहे. सावानाने आपल्या सभासदांसाठी उपलब्ध असलेल्या एक लाख ४२ हजारांहून अधिक पुस्तकांची यादी एका लिंकवर उपलब्ध करून दिली असल्याचे प्रभावळकर म्हणाले. सर्व पुस्तक त्यांचे विषय, लेखक यांच्या नावानुसार शोधता येतील, तर केवळ काही शब्द टाकून ही यादी उपलब्ध होईल, असे आधुनिकीकरण यामध्ये केले असून, पुढे पुस्तकांचे आरक्षणही दुसऱ्या टप्प्यात करता येणार आहे. निवडलेल्या पुस्तकांची घरपोच सेवा हे तिसऱ्या टप्प्यात होणार असून, शुल्क आकारून ही सोय सभासदांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम वाचनालयाच्या जुन्या देवघेव विभागात पार पडला. यावेळी अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, कार्याध्यक्ष गिरीश नातू, संजय करंजकर, ॲड. अभिजित बगदे तसेच ग्रंथसचिव जयप्रकाश जातेगावकर उपस्थित होते.

जुन्या पोथ्यांचे लवकरच डिजिटायझेशन होऊन सभासदांना उपलब्ध होणार आहेत. तसेच ही लिंक सर्व सभासदांच्या मोबाइलवर, व्हॉट‌्सॲपवर पाठवली जाणार असून, सभासदांनी त्यांचे दूरध्वनी क्रमांक तपासून घ्यावे. अधिक माहिती व सभासद होण्यासाठी आणि यादी पाहण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर ८६६८५२०१०७, ८६०५६०३००२, ८६६८५०२५६२ सभासदांनी संपर्क साधावा.

ओपेक्स सिस्टिमद्वारे मिळणार माहिती

सभासद शहरातील विविध भागांत राहत असल्यामुळे त्यांना हवे असणारे पुस्तक वाचनालयात मिळाले नाही तर त्यांचा हिरमोड होतो. त्यासाठी वाचनालयाच्या वतीने ओपेक्स सिस्टिमद्वारे घरबसल्या वाचनालयात उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची माहिती मिळणार आहे. या लिंकमुळे पुस्तके निवडणे सभासदांना अधिक सोयीस्कर होणार असून, त्यांची आवडती पुस्तके तसेच पुस्तकांची उपलब्धता ही समजणार असून, हा उपक्रमाचा पहिला टप्पा आहे.

हेही वाचा :

Back to top button