Nashik Crime : चार कोटींच्या विम्यासाठी खून करून अपघाताचा बनाव, वाटणीत पैसे कमी मिळाल्याने खुनाचे बिंग फुटले | पुढारी

Nashik Crime : चार कोटींच्या विम्यासाठी खून करून अपघाताचा बनाव, वाटणीत पैसे कमी मिळाल्याने खुनाचे बिंग फुटले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; टर्म इन्शुरन्सचे चार कोटी रुपये मिळवण्यासाठी एकाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्याचा कट रचला. मात्र, त्यात यश न आल्याने मित्रांनी विमाधारकाचाच खून करून अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर मृताची पत्नी म्हणून दुसऱ्या महिलेची विमाकंपनीला माहिती देत कंपनीकडून चार कोटी रुपये उकळले. मात्र, पैशांच्या वाटणीवरून संशयितांमध्ये वाद झाल्याने एका संशयिताने मृताच्या भावास सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर खुनाचे बिंग फुटले.

या प्रकरणी मुबई नाका पोलिस ठाण्यात हिट अँड रनचा दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले असून, पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.२०) पोलिस कोठडी सुनावली आहे. रजनी कृष्णदत्त उके, मंगेश बाबूराव सावकार, दीपक अशोक भारुडकर, किरण देवीदास शिरसाठ, हेमंत शिवाजी वाघ व प्रणव राजेंद्र साळवे (सर्व रा. नाशिक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अशोक सुरेश भालेराव (४६, रा. भगूर रोड) यांचा २ सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी अशोक यांचे बंधू प्रवीणकुमार (४१, रा. भगूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनोळखी वाहनचालकाविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार वरकरणी अपघाताचा वाटत होता. परंतु प्रवीणकुमार यांना काही दिवसांपूर्वी रजनी उके या महिलेने संपर्क साधून तुमच्या भावाचा अपघाती नव्हे तर घातपातामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. याची माहिती प्रवीणकुमार यांनी मुंबई नाका पोलिसांना देताच त्यांनी सखोल चौकशी केली. संशयितांच्या बँक खात्याचे व्यवहार तपासले असता सत्य बाहेर आले आणि पोलिसांनी सहाही संशयितांना अटक केली. न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत सर्वांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासात संशयित मंगेश सावकार याच्याकडे विनापरवाना पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे आढळून आल्याने पोलिसांनी या हत्यारांचाही तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश सावकार याच्या बँक खात्यात सुमारे सव्वा कोटी रुपये आढळून आले आहेत. तसेच या आधीही संशयितांनी अपघाती विमा रक्कम बळकावली आहे काय? याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

असा रचला बनाव

संशयित मंगेश हा विमा प्रतिनिधी म्हणूनही काम करत होता. अपघाती मृत्यूनंतर विमाभरपाईची पध्दत त्याला सखोल माहिती होती. त्यानुसार भालेराव व इतरांनी भालेराव यांचाच चार कोटींचा विमा काढला. त्यात वारस म्हणून रजनी उके हिस भालेराव यांची पत्नी म्हणून दाखविले. त्यानंतर भालेराव यांच्या जागी दुसऱ्याचा मृतदेह ठेवून तो भालेराव यांचाच असल्याचा कट संशयितांनी रचला होता. मात्र, त्यात त्यांना यश येत नव्हते. त्यामुळे संशयितांनी अशोक भालेराव यांचाच खून करून अपघाती मृत्यूचा बनाव रचला आणि खुनानंतर विम्याचे चार कोटी रुपये मिळविले.

कट रचून केला खून

अशोक भालेराव हे कामानिमित्त मुंबईला गेले होते. ते २ सप्टेंबर २०२१ पहाटे मुंबईहून परतले होते. ही बाब संशयितांना माहिती असल्याने त्यांनी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ भालेराव पायी येत असताना दोघा संशयितांनी त्यांना अडवले व डोक्यात टणक वस्तूने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर भालेराव यांना वाहनाने धडक देऊन पसार झाले. त्यामुळे भालेराव यांचा खून नव्हे तर अपघाती मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात दिसत होते. मात्र, विम्यापोटी मिळालेल्या पैशांच्या वाटणीवरून संशयितांमध्ये वाद झाला व खुनाचे बिंग फुटले.

मंगेश सावकारचा ‘डबल गेम’

पोलिस तपासात मंगेश हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीस त्याने अशोक भालेराव यांना विम्याचे पैसे बळकावण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्यास सांगितले. मात्र, हा बेत सफल होत नसल्याने सावकार याने इतर संशयितांसह मिळून भालेराव यांच्याच खुनाचा कट आखत तडीस नेला. दरम्यान, विम्याचे पैसे किती मिळणार हे त्याने इतरांना सांगितले नाही. विम्याचे पैसे मिळाल्यानंतर त्याने पैशांची वाटणी केली. मात्र, रजनीला संशय आल्याने पैसे वाटपावरून संशयितांमध्ये वाद झाला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

हेही वाचा :

Back to top button