

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वरांचा साज अन् वादनाच्या उत्स्फूर्त लयीने रंगलेल्या वातावरणात 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या स्वरयज्ञाला बुधवारी दमदार सुरुवात झाली. दिग्गज कलाकारांच्या गायकीने स्वरांचा साज चढला अन् या सुरेल प्रवासात रसिक मंत्रमुग्ध झाले. दोन वर्षानंतर संगीताच्या स्वरयज्ञाची "याचि देही याचि डोळा" अनुभूती मिळाल्याने रसिकांमध्येही उत्साह दिसून आला अन् पहिल्याच दिवशी झालेल्या रसिकांच्या गर्दीने खर्या अर्थाने सवाईची सुरुवात झाल्याची प्रचिती दिली.
पं. उपेंद्र भट यांच्या सुरेल मैफिलीने महोत्सवाला सुरुवात झाली. उस्ताद अमजद अली खाँ यांनी सरोदच्या मंजूळ तारा छेडत एका अभूतपूर्व कलाविष्काराची दिलेली सुंदर अनुभूती खास ठरली. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या बहारदार गायनाने झाली. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शाश्वती मंडल यांचा स्वराविष्कार रसिकांच्या मनाला भिडला.
त्यानंतर एका मागून एक झालेल्या गायन आणि वादनाच्या सत्रात झालेल्या सुरावटीच्या आतषबाजीने रसिक मंत्रमुग्ध झाले. पं. रतनमोहन शर्मा यांच्या गायकीने संगीतमार्तंड पं.जसराज हेच जणू प्रत्यक्ष गात असल्याची अनुभूती दिली. शेवटी उस्ताद अमजद अली खाँ यांच्या सरोद वादनाने महोत्सवाची सुरेल सांगता केली. त्यांच्या सरोदच्या स्वरलहरींनी महोत्सवात रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला.
पं. उपेंद्र भट यांनी राग मधुवंतीमध्ये 'सोनी बलमा मोरे' या बंदिशीद्वारे आपल्या गायनाची सूरमयी सुरुवात केली. त्यांनतर त्यांनी 'शाम अब तक न आए…' बंदिश सादर केली. गंगाधर महाबंरेरचित पंडित भीमसेन जोशी यांच्या लोकप्रिय 'बिजलीचा टाळ, नभाचा मृदंग' या अभंग सादरीकरणाद्वारे त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना संवादिनीवर निरंजन लेले, तबल्यासाठी सचिन पावगी, तानपुर्यासाठी अनमोल थत्ते, देवव्रत भातखंडे आणि धनंजय भाटे, सारंगीसाठी फारुख लतीफ खान, पखवाज मनोज भांडवलकर, माऊली टाकळकर यांनी टाळसाठी साथसंगत केली.
या सादरीकरणानंतर मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा 'वत्सलाबाई जोशी पुरस्कार-2022' पं. उपेंद्र भट यांना प्रदान करण्यात आला. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला. मंडळाचे विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मूळगुंड, आनंद भाटे, मिलिंद देशपांडे, डॉ. प्रभाकर देशपांडे, पं. उपेंद्र भट यांच्या पत्नी मित्रविंदा भट आदी उपस्थित होते. महोत्सवात सवाई गंधर्व यांचे नातेवाईक एस. जी. जोशी हे खास हुबळीहून प्रवास करून आले होते. त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्यावरील विशेष टपाल तिकीट श्रीनिवास जोशी यांना सुपूर्त केले.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शाश्वती मंडल यांचे सुमधुर गायन झाले अन् त्यांच्या गायनाने महोत्सवात रंग भरला. शाश्वती यांनी राग मारवामध्ये तीलवाडा तालात 'पिया मोरे…' हा विलंबित ख्याल आणि द्रुत एकतालमध्ये 'ओ गुनियन गाओ' ही बंदिश पेश केली. खमाज टप्पा हा गानप्रकार अतिशय तयारीने सादर केला. त्यांना संवादिनीवर डॉ. मौसम, तबल्यासाठी भरत कामत यांनी व तानपुरासाठी स्वाती तिवारी आणि आकांक्षा ग्रोव्हर यांनी संगत केली.
तिसर्या सत्रात संगीत मार्तंड पं. जसराज यांचे शिष्य व भाचे रतन मोहन शर्मा यांनी गायन सादर केले. सूर्याची उपासना असणार्या गायत्री मंत्राने त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. त्यानंतर राग गोरख कल्याणमध्ये 'तुमरो संग मोहन मोरी प्रीत लाग रही' ही विलंबित बंदिश तर द्रूत त्रितालात 'नेक कृपा कर आयी रे' बंदिश आणि तराणा सादर केला. रसिकाग्रहास्तव त्यांनी हवेली संगीत प्रकारातील रचनाही सादर केली. 'ओम नमो भगवते वासुदेवाय:' या भजनाने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली.
त्यांना अभिनय रवांदे (हार्मोनियम), अजिंक्य जोशी (तबला), सुखद मुंडे (पखावज), वैदेही अवधानी व भाग्यश्री कुलकर्णी (तानपुरा) यांनी साथसंगत केली शेवटच्या सत्रात उस्ताद अमजद अली खाँ स्वरमंचावर आले, त्या वेळी रसिकांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. त्यांनी वादन करण्यापूर्वी त्यांना साथसंगत करणार्या तबला वादक अनुप्रत चॅटर्जी आणि अमित कवठेकर यांनी तबल्याची जुगलबंदी सादर केली. त्यांनी आपल्या वादनाची सुरुवात राग शुद्ध कल्याणद्वारे केली. त्यांनतर गणेश कल्याण ही एकतालातील रचना सादर केली. राग दरबारी सादर करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर खमाज रागात 'एकला चलो रे' या रचनेच्या सादरीकरणाद्वारे त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला.
पंडित भीमसेन जोशी यांनी माझ्या वडिलांकडूनही तालीम घेतली होती, ही गोष्ट त्यांनीच मला सांगितली होती. या नात्याने ते मला कायम गुरुभाई म्हणत असत. आमचे नाते हे स्वर-लयीचे आहे. ते रक्ताच्या नात्यापेक्षाही मजबूत आहे. बंगाल, दिल्ली इथे अजूनही रात्रभर मैफली होतात. पुण्यात मात्र दहा वाजता मैफल बंद करावी लागते. माझी येथील प्रशासन अधिकार्यांना विनंती आहे की, संगीताच्या मैफलीसाठी वेळेचे बंधन नसावे.
– उस्ताद अमजद अली खाँ,
सरोदवादकइतक्या वर्षांत पुण्यातील नागरिकांनी मला भरभरून प्रेम दिले. त्यामुळेच आज मिळालेला 'वत्सलाबाई जोशी' पुरस्कार मी येथील नागरिकांना समर्पित करतो.
– पं. उपेंद्र भट, ज्येष्ठ गायक
महोत्सवातील क्षणचित्रे
महोत्सवाच्या सुरुवातीस कोरोना काळात निधन झालेल्या दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पहिल्याच दिवशी महोत्सवात रसिकांची गर्दी.
'स्वर भीमसेन 2023' या दिनदर्शिकेचे प्रकाशन
महोत्सवातील आजचे सादरीकरण
अविनाश कुमार (गायन)
पं. साजन मिश्रा व स्वरांश मिश्रा (गायन)
उस्ताद आलम खाँ (सरोद)
डॉ. एन. राजम, संगीता शंकर, रागिणी आणि नंदिनी शंकर (व्हायोलिन)