नाशिक : राज्यात 3,110 तलाठ्यांची भरती | पुढारी

नाशिक : राज्यात 3,110 तलाठ्यांची भरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण तीन हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच पदोन्नतीची प्रक्रियादेखील सुरू होणार आहे. त्यामुळे महसूल विभागावरील अतिरिक्त कामाचा ताण हलका होण्यास मदत होईल. गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तलाठी सजा पुनर्रचनेनुसार विहीत केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसुली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरून वाटप करण्यात आलेल्या तीन हजार 110 सजे आणि 518 महसुली मंडळ कार्यालयासाठी तीन हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण 3 हजार 628 पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहेत.

अशी आहेत पदे…
नाशिक महसुली विभागात एकूण 689 तलाठी सजे आणि 115 महसुली मंडळे आहेत. पुणे विभागाअंतर्गत 602 तलाठी सजे आणि 100 महसुली मंडळे आहेत. अमरावती विभागात 106 तलाठी सजे आणि 18 महसुली मंडळे आहेत. तसेच नागपूर विभागात तलाठ्यांची 478 तलाठी सजे व 80 महसुली मंडळे, औरंगाबाद विभागात एकूण 685 तलाठी सजे आणि 114 महसुली मंडळे आहेत. तर कोकण विभागाअंतर्गत एकूण 550 तलाठी सजे आणि 91 महसुली मंडळे आहेत.

हेही वाचा:

Back to top button