कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्समधील महत्त्वाची कागदपत्रे पळवली; तपास यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत

कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्समधील महत्त्वाची कागदपत्रे पळवली; तपास यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स कंपनीचा सर्वेेसर्वा तथा मॅनेजिंग डायरेक्टर लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार याच्यासह 27 जणांवर गुन्हा दाखल होऊन पंधरवडा झाला तरी तपास यंत्रणा अजूनही ढिम्म आहे. कंपनीच्या मुख्यालयासह एजंटांच्या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे लंपास होऊनही यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत राहिल्याने तक्रारदारांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

तक्रारदारांना 'टार्गेट'चा प्रयत्न; गुंतवणूकदारात संतापाची लाट

गुंतवणूकदारांच्या मुद्दलसह परतावा देण्यास टाळाटाळ करणार्‍या संशयितांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार्‍यांना मुख्य संशयित, संचालक व एजंटांकडून टार्गेट करण्यात येत आहे. ऑनलाईन मिटिंगद्वारे तक्रारदारांविरोधात चिथावणी देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. या प्रकाराविरुद्ध गुंतवणूकदार कृती समितीने आक्रमक पावले उचलण्याचा निर्धार केला आहे.

पोलिस महानिरीक्षकांकडे स्वतंत्र तपास यंत्रणांची मागणी करणार

फसवणूक केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल होऊनही तपास यंत्रणांकडून संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने येत्या दोन दिवसांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची शिष्टमंडळामार्फत भेट घेऊन चौकशी व कारवाईसाठी स्वतंत्र तपास यंत्रणा स्थापन करण्याची मागणी करण्यात येणार आहे, असे कृती समितीचे विश्वजित जाधव, गौरव पाटील, रोहित ओतारी यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांनी 'त्याला' खडे बोल सुनावले !

कंपनीच्या गडहिंग्लज येथील संचालकाने शुक्रवारी रात्री झूम मिटींगद्वारे काही गुंतवणूकदारांशी संपर्क साधला. यावेळी गुंतवणूकदारांनी मुद्दल व परताव्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला; मात्र देय रकमेबाबत अवाक्षर न काढता संबंधिताने कंपनीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार्‍यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. कंपनीने तीन महिन्यांपासून आर्थिक व्यवहार थांबविले आहेत. शिवाय कंपनीच्या प्रमुखांसह दरमहा कोट्यवधीची मिळकत घेणार्‍यांकडून शंकांचे निरसन झाले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असेही गुंतवणूकदारांनी संबंधिताला खडे बोल सुनावल्याचे समजते. या घटनेची शनिवारी दिवसभर चर्चा होती.

ऑनलाईनद्वारे आज पुन्हा होणार संवाद

कंपनीचा प्रमुख तथा मॅनेजिंग डायरेक्टर लोहितसिंग सुभेदार रविवारी सायंकाळी पाच वाजता ऑनलाईनद्वारे गुंतवणूकदारांशी संपर्क साधणार असल्याचे समजते. एकाचवेळी दहा ते बारा हजारांवर गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले.

संचालकांसह एजंटांनी परदेशी पलायन केल्याची चर्चा

गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी 27 जणांविरुद्ध गुन्हा दाखल होताच काही संचालक व एजंटांनी गुंतवणूकदारांचा ससेमिरा टाळण्यासाठी परदेशी पलायन केल्याची गुंतवणूकदारांमध्ये चर्चा आहे. 'गोल्डमन'ने शाहूपुरीतील कार्यालयाला पंधरवड्यापूर्वी टाळे ठोकून महत्त्वाची कागदपत्रेही गायब केली आहेत. अन्य संचालक व एजंटांनी स्वत:ची कार्यालयेही बंद करून आर्थिक उलाढालीचे रेकॉर्ड हलविल्याने मत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे गुंतवणूकदाराकडून सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news