मुलांनी बनवली प्रदूषण शोषणारी जगातील पहिली कार | पुढारी

मुलांनी बनवली प्रदूषण शोषणारी जगातील पहिली कार

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौतील आठ ते चौदा वर्षे वयोगटातील चार शाळकरी मुलांनी तीन पॉल्यूशन फ्री इलेक्ट्रिक मोटारी बनवल्या आहेत. ही कार प्रदूषण निर्माण करीत नाही, शिवाय हवेचे प्रदूषण शोषूनही घेते व शुद्ध हवा बाहेर सोडते. त्यांचे हे काम इतके मोठे आहे की नॅशनल जिओग्राफिकपासून डिस्कव्हरी चॅनेलपर्यंत जगभरातील अनेक चॅनेल्स त्यांची स्टोरी कव्हर करण्यासाठी संपर्कात आहेत. उत्तर प्रदेश सरकारने तर या मुलांच्या सन्मानार्थ विधानसभेलाही सजवले आणि त्यांना सन्मानित केले.

या मुलांनी ‘डीएफएस’ म्हणजेच ‘डस्ट फिल्ट्रेशन सिस्टीम’ बनवून या इलेक्ट्रिक मोटारी तयार केल्या आहेत. या मोटारी चालवत असताना प्रदूषण होत नाही, उलट प्रदूषण शोषून घेतले जाते. या मोटारी देशातील 29 वर्षीय प्रसिद्ध रोबोटिक एक्स्पर्ट मिलिंद राज यांच्या डिफेन्स रिसर्च सेंटरमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. अकरा वर्षांचा लहान संशोधक गर्वित सिंह याने सांगितले की आमच्या कारमध्ये एक स्पेशल फीचर आहे-डीएफएस म्हणजेच डस्ट फिल्ट्रेशन सिस्टीम. गाडी जितकी चालेल तितकी आसपासच्या 5 ते 7 फुटांच्या परिघातील प्रदूषण नष्ट करील. धूळ आणि धुराला ही कार शोषून घेते. ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे आणि त्यामुळे ती स्वतः हवेचे प्रदूषण करीत नाही. ‘डीएफएस’मध्ये एक फिल्टर आणि एक स्क्विरल केज मोटर आहे. ती प्रदूषित हवेला खेचून घेते. फिल्टर अशा हवेला स्वच्छ करतो. अशी स्वच्छ हवा वरील भागात असलेल्या ग्रीलमधून वातावरणात सोडली जाते. तसेच मोटारीत 5-जी फीचरही आहे ज्याच्या मदतीने आपण एक-दोन बटणाने ऑपरेट करू शकतो, गाडी पुढे-मागे करू शकतो. आर्यव या मुलाने सांगितले, आम्ही ज्यावेळी ही कार विकसित करीत होतो त्यावेळी हेच डोक्यात होते की आपण अशी कार बनवायची जी कुणीही खरेदी करू शकेल. देशातील प्रत्येक घरात पॉल्यूशन फ्री इलेक्ट्रिक कार असावी असे आम्हाला वाटते. पाच ते सहा फूट लांबीची ही कार बनवण्यासाठी एक लाखापेक्षा थोडा अधिक खर्च आला आहे. ही कार सोलर हायब्रीड डीएफएस व अल्ट्राव्हायोलेट टेक्नॉलॉजी असलेली कार आहे. कारमध्ये स्टिअरिंग, चांगले ब्रेक्स, एक्सलरेटर, लाईटस्, आरामदायक सीटस् आणि मोटोराइज्ड गियर आहेत. एकदा चार्ज केल्यावर ही कार 110 किलोमीटर धावू शकते. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये या मोटारी बनवल्या असून त्या एक सीटपासून तीन सीटपर्यंतच्या आहेत. या छोट्या मुलांनी 2021 च्या मे-जूनमध्ये ही कार बनवण्यास सुरुवात केली होती. आता या कारचे पेटंटही केले जाणार आहे. त्यांना या कामात मिलिंद राज यांनी मदत केली. गर्वित सिंह, श्रेयांश मेहरोत्रा, विराज मेहरोत्रा आणि आर्यव मेहरोत्रा अशा चार मुलांच्या या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळत आहेत.

Back to top button