नाशिकमध्ये दुचाकीस्वार चोरटे मोकाट, अल्पवयीन मुलीकडील मोबाइल ओरबाडला | पुढारी

नाशिकमध्ये दुचाकीस्वार चोरटे मोकाट, अल्पवयीन मुलीकडील मोबाइल ओरबाडला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात दुचाकीस्वार चोरटे मोकाट असून निर्मनुष्य किंवा गर्दी नसलेल्या रस्त्यावर संधी साधून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व महागडे मोबाइल ओरबाडून नेत आहेत. थत्ते नगर परिसरात अल्पवयीन मुलीकडील मोबाईल ओरबाडून दुचाकीस्वार चोरट्यांनी पळ काढल्याची घटना मंगळवारी (दि.६) सकाळी घडली.

सुविधी मनीष भंडारे (सौभाग्य नगर, गंगापूर रोड) या थत्ते नगर येथून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी सुविधी यांच्याकडील मोबाइल हिसकावून नेला. चोरटे गंगापूर नाक्याच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी सुविधी यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. याआधीही शहरातून चोरट्यांनी जबरी चाेरी करीत किंमती ऐवज लंपास केला आहे. त्यातील चोरट्यांचा अद्याप शोध न लागल्याने नागरिकांचा ऐवज चोरट्यांच्याच ताब्यात आहे. एक नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीत जबरी चोरीप्रकरणी शहरात १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी नऊ गुन्ह्यांमध्ये सोन्याचे दागिने ओरबाडण्यात आले आहेत तर चार गुन्ह्यांमध्ये पैसे, मोबाइल ओरबाडून नेले आहेत.

यात चोरट्यांनी चार लाख ८९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ६८ लाख ८७ हजार रुपयांची रोकड व इतर किंमती ऐवज हिसकावून नेला आहे. हे गुन्हे उघडकीस न आल्याने चोरटेही मोकाट असून त्यांच्याकडून इतर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button