Goa Politics | दिगंबर कामत, मायकल लोबो यांना अपात्रप्रकरणी सभापतींकडून नोटीस | पुढारी

Goa Politics | दिगंबर कामत, मायकल लोबो यांना अपात्रप्रकरणी सभापतींकडून नोटीस

पणजी : पुढारी वृत्तसेवा : Goa Politics- काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या ८ आमदारांचे नेतृत्व केलेले माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि माजी विरोधी पक्षनेते व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना सभापती रमेश तवडकर यांनी नोटीस बजावली आहे. त्यांना १६ डिसेंबररोजी दुपारी १२ वाजता सुनावणीसाठी सचिवालयात बोलावले आहे.

गोवा विधानसभेची निवडणूक मार्च २०२२ मध्ये पार पडली. त्यानंतर भाजपला २० जागा मिळाल्या. तर काँग्रेसचे ११ आमदार निवडून आले. परंतु अवघ्या सहा महिन्यांमध्ये काँग्रेसच्या ११ आमदारांपैकी ८ आमदारांनी दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, या पक्षांतरापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी जुलै २०२२ मध्ये कामत व लोबो यांची आमदारकी रद्द करावी. तसेच लोबो यांना विरोधीपक्ष नेतेपदावरुन हटवावे, अशी मागणी सभापतींकडे केली होती.

मात्र, या मागणीवर निर्णय होण्यापूर्वीच ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसने लोबो यांच्या जागी युरी आलेमांव यांची ३ आमदारांच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली होती. सभापती तवडकर यांनी काँग्रेसच्या पहिल्या याचिकेवर निवाडा देण्यासाठी आज (दि.७) नोटीस बाजावली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या फुटलेल्या ८ आमदारांना अपात्र करा, अशी माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेली याचिका सभापती समोर आहे. मात्र, पक्षाने अद्यापही तशी मागणी करणारी याचिका दाखल केलेली नाही. (Goa Politics)

हेही वाचलंत का ? 

Back to top button