किमान तापमानात कमालीची वाढ, डिसेंबरचा पहिला आठवडा थंडीविनाच ! | पुढारी

किमान तापमानात कमालीची वाढ, डिसेंबरचा पहिला आठवडा थंडीविनाच !

डिसेंबर महिना म्हणजे कडाक्याची थंडी, असे गृहीतच धरले जाते. संपूर्ण देशच या महिन्यात गारठलेला असतो. किमान तापमानाची जणू शहरांची स्पर्धा असते. मात्र, यंदा हे चित्र गायब झाले असून, हिवाळ्यात पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे थंडी गायब होऊन किमान व कमाल तापमानात अवघ्या काही अंशांचा फरक उरलाय. त्यामुळे आरोग्याला सांंभाळा, असा इशाराच हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. यंदा देशातून मान्सून परतण्यास पंधरा दिवस उशीर झाला. अगदी दिवाळीतही शेतात पाणी होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातही सतत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे या महिन्यात खूप कमी दिवस थंडीचे होते. डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडेल, असे वाटत असताना मात्र डिसेंबरचा पहिला आठवडा थंडीविना जाईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्याचा पारा 22 अंशांवर

संपूर्ण देशाचा नकाशा हवामान विभागाने दाखविला आहे. यात तीन रंग आहेत. निळा म्हणजे दाट थंडी, हिरवा साधारण थंडी व पिवळा म्हणजे उष्णतेचे प्रदेश आहेत. या नकाशात देशाच्या अगदी वरच्या भागात कश्मीरमध्येच थंडीचा कडाका आहे. नंतर दक्षिण भारतातील काही भागात थोडी थंडी आहे. मात्र, संपूर्ण देशात पिवळा रंग दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की, संपूर्ण देशातील शहरांचे सरासरी किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त आहे. देशात किमान तापमान 12 ते 25 अंशांवर आहे. तर, महाराष्ट्रात ते 16 ते 22 अंशांवर गेले आहे. महाराष्ट्रात रत्नागिरीचे कमाल तापमान 34 अंशांवर आहे, तर किमान तापमान तब्बल 23.5 अंशांवर आहे. त्यापाठोपाठ मुंबई शहराचे कमाल तापमान 31, तर किमान तापमान 24 अंशांवर आहे. मुंबईत दिवसा फिरताना उन्हाळ्याचा अनुभव येत आहे.

महाराष्ट्राचा पारा वाढला..

राज्यात कमाल व किमान तापमानात काही अंशांचा फरक उरला आहे. थंडीचा कडाका पूर्ण गेला असून, किमान तापमानात
4 ते 7 अंशांनी वाढ झाली आहे. असेच वातावरण आगामी पाच ते सहा दिवस राहील. कारण, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे काही भागांत पाऊसही होईल.

सध्या हवेचे दाब खूप कमी झाले आहे. वार्‍याची दिशा, हवेचे दाब आणि आर्द्रतेवर वातावरणातील बदल अवलंबून असतात. बंगालच्या उपसागरात वारंवार हवेची चक्रीय स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे तिकडून बाष्पयुक्त वारे येत आहे. तसेच उत्तर भारतात यंदा पश्चिमी चक्रवातांचा प्रभाव कमी झाला आहे. ज्यामुळे थंड वारे कमी झाले आहे. या सर्व वातावरणामुळे किमान व कमाल तापमानात अचानक मोठी वाढ झाली आहे.
                                                          – रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

कमाल व किमान तापमान
शहर कमाल किमान घट
गोंदिया 31.0 13.5 3.8
नाशिक 31.3 15.4 4.6
औरंगाबाद 30.2 16.4 3.7
जळगाव 31.7 17.6 4.6
पुणे 31.1 18.4 5.8
कोल्हापूर 31.3 21.3 5.3
सांगली 31.9 20.6 4.9
सातारा 30.1 21.8 7.2
सोलापूर 33.2 21.3 4.8
नागपूर 30.5 15.4 1.9
मुंबई 31.8 24.0 2.0
रत्नागिरी 34 23.5 2.4

Back to top button