सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ बंदच्या निर्णयावर ठाम | पुढारी

सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ बंदच्या निर्णयावर ठाम

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

सप्तशृंगगडावरील देवी संस्थान आणि रोपवे कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ व व्यापारी गाव बंद ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, तहसीलदार बंडू कापसे व पोलिस निरीक्षक नागरे यांची मध्यस्थी निष्फळ ठरली असून, ग्रामस्थ व व्यापारी आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत. देवीला भाविकांनी सोने, चांदी व रकमेच्या दानाची माहिती दरमहा वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

देवी संस्थानने गेल्या चार दिवसांपूर्वी 40 सुरक्षा कर्मचाऱ्यांची भरती केली. या भरतीविरोधात तसेच अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांनी पहिली पायरी ते रोपवे ट्रॉली व ट्रस्ट कार्यालय येथे रॅली काढत निषेध व्यक्त केला. ग्रामस्थ, व्यापाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर आज गावातून फेरी काढत गाव बंद करण्याची हाक दिली. या फेरीत ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, व्यापारी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

सुरक्षारक्षकांवर दरवर्षी एक कोटी 25 लाखांचा खर्च भाविकांच्या देणगीतून विश्वस्त संस्था करत आहे. तो खर्च थांबवून भाविकांना विविध सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. भाविकांना रोपवेने मंदिरात नेण्याची आणि पुन्हा खाली आणण्याच्या वेळा निश्चित करण्यात याव्यात, पायरीच्या बाजूला शौचालय बांधण्यात यावे, धर्मार्थ रुग्णालयात डाॅक्टर उपलब्ध करण्यात यावे, ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्यात यावे, ट्रस्टमध्ये कामावर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला सामावून घ्यावे, गाभाऱ्यातील कठडा कमी करण्यात यावा, मॅरेथॉन स्पर्धा बंद करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button