ढोरजळगाव : अहो मामा, काका पेरू घ्या, सीताफळ घ्या; प्राथमिक शाळेत खाद्यमहोत्सव | पुढारी

ढोरजळगाव : अहो मामा, काका पेरू घ्या, सीताफळ घ्या; प्राथमिक शाळेत खाद्यमहोत्सव

ढोरजळगाव; पुढारी वृत्तसेवा : अहो मामा, अहो काका पेरू घ्या सीताफळ घ्या, जिलेबी घ्या,पाच रुपयाला एक लाडू ,सुट्टे नाही दोन घ्या, हा संवाद कुठल्या आठवडे बाजारातील नाही तर हा आहे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दुकानदार आणि पालक ग्राहक यांच्यातील.
निम्मित होते ढोरजळगाव शे येथील प्राथमिक शाळेतील खाद्य महोत्सवाचे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी खाऊच्या दुकानाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या ,कुठे गुलाब जामून, तर कुठे भेळ, खमंग वडापाव, ढोकळा, जिलेबी, इडली सांबर, तिखट पाणीपुरी, तर पेरू, सीताफळ, केळी, पपई या फळांच्या पाट्या घेऊन काल विद्यार्थी चक्क दुकानदार बनले होते. विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलला भेट देत पालक व ग्रामस्थांनी अनेक प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतला.

विक्रीतून मिळालेले पैसे पाहून विद्यार्थी आनंदाने हरखले होते. फूड फेस्टिवलला श्रीराम विद्यालय, प्राथमिक शाळा ढोरजळगाव-ने, मलकापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन बालकांचा आनंद द्विगुणित केला. तीन तास चाललेल्या या उपक्रमातून सुमारे पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली.

कार्यक्रमास केंद्रप्रमुख सुरेंद्र गिर्‍हे, मुख्याध्यापक गोरक्षनाथ दुसुंगे, प्रमोद देशमुख, सिंधूताई देवकर, सुरेश शेळके आदींनी परिश्रम घेतले. या वेळी डॉ.सुधाकर लांडे, राजेंद्र देशमुख, गणेश पाटेकर, विजय म्हस्के, भाऊसाहेब अकोलकर, डॉ.देवीदास देशमुख, रोहन साबळे, सुधाकर आल्हाट,संपत तुतारे ,शंकर दळे, तात्यासाहेब पाटेकर, बाळासाहेब जाधव,डॉ.प्रदीप पाटेकर, अविनाश पाटेकर, अमोल देशमुख, किरण हंबर, गणेश कोल्हे, दत्तात्रय खोसे, अनिल अकोलकरआदी उपस्थित होते.

ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था
इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी समीक्षा गर्जे हिने चक्क पेटीमचे स्टिकर समोर ठेऊन ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने पेमेंटची व्यवस्था करून त्याबद्दल सर्वांना माहिती दिली. तिच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Back to top button