कोपरगाव : बिपीनराव कोल्हे यांना जीवन गौरव पुरस्कार | पुढारी

कोपरगाव : बिपीनराव कोल्हे यांना जीवन गौरव पुरस्कार

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनराव कोल्हे यांना साखर उद्योगातील भरीव योगदानाबद्दल देशपातळीवर कार्यरत असलेल्या शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्युट कोईमतूर अंतर्गत सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेने प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्युट संस्थेचे माजी संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन.विजयन नायर यांच्या हस्ते देऊन सन्मान केला आहे. सदरचा पुरस्कार कोल्हे यांनी स्व. शंकरराव कोल्हे व सभासद शेतकर्‍यांच्या चरणी समर्पित केला आहे.

या संस्थेच्या संचालिका डॉ. जी. हेमप्रभा याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, पुढच्या वर्षापासून सहकारी साखर उद्योगात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या नावे प्रतिष्ठेचा देश पातळीवर पुरस्कार या संस्थेचेवतीने दिला जाणार आहे.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने साखर उत्पादनाबरोबरच आसवनी त्यावरील विविध रासायनीक उपपदार्थांची निर्मीती करून सहवीज निर्मीती, बायोगॅस, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मीती करून देशपातळीवर नावलौकीक मिळविला आहे.

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिपीनराव कोल्हे यांनी कार्यक्षेत्रातील सभासद शेतकर्‍यांचे उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्याबाबत धडक कृती विकास कार्यक्रम राबविले. ऊस संशोधनातील शिखर संस्था असलेल्या शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्यूट सोसायटी, कोईमतूर अंतर्गत उसाच्या विविध विकसीत जातीचे ऊस बेणे सभासदांसह शेतकर्‍यांना उपलब्ध करून कमी पाण्यात, कमी श्रमात अधिक ऊस उत्पादन कसे मिळेल, यावर सातत्यांने भर दिला आहे.

सत्कारास उत्तर देतांना बिपीनराव कोल्हे म्हणाले की, सध्या ऊस उतारा आधारीत दर दिले जात असल्याने प्रती हेक्टरी ऊस व साखर उतारा देणार्‍या ऊस जातींची गरज आहे आणि त्यासाठी ऊस संशोधन केंद्र कोईमतूर संस्थेने को- 7219, को- 86032 सारख्या ऊस जाती विकसीत करून शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. जगात ब्राझील मध्ये 15 टक्के साखर उतारा देणार्‍या ऊस जाती विकसीत झाल्या आहेत. त्या भारतात विकसीत झाल्या तर साखर उद्योगाचे भवितव्य अधिक उज्वल होईल.

ऊस संशोधनात कोईमतूर संस्थेने मोठ्या प्रमाणात सहकार्य देऊन शेतकर्‍यांचे प्रति हेक्टरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले आहे. साखर उद्योगातील भरीव योगदान बद्दल शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोईमतुर यांनी आपला जो सन्मान केला आहे. तो व्यक्तिगत माझा नसून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचा असल्याचे ते म्हणाले. या पुरस्काराबद्दल बिपिनराव कोल्हे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

.. तर साखर उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल
जगात ब्राझील मध्ये 15 टक्के साखर उतारा देणार्‍या ऊस जाती विकसीत झाल्या आहेत. त्या भारतात विकसीत झाल्या तर साखर उद्योगाचे भवितव्य अधिक उज्वल होईल. ऊस संशोधनात कोईमतूर संस्थेने मोठ्या प्रमाणात सहकार्य देऊन शेतकर्‍यांचे प्रति हेक्टरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले असल्याचे बिपीनराव कोल्हे यांनी सांगितले.

Back to top button