नाशिक : सुपर- 50 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी | पुढारी

नाशिक : सुपर- 50 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून सुपर 50 या उपक्रमाची परीक्षा 12 नोव्हेंबर रोजी घेतल्यानंतर सुमारे 2 हजार 182 विद्यार्थ्यांतून 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी पहिल्या 105 विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा परिषदेच्या निवड समितीद्वारे विद्यार्थ्यांकडून मागविण्यात आली. यावेळी रावसाहेब थोरात सभागृहामध्ये विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे निवड समितीकडे सुपूर्द केली.

नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील अनुदानित अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाचे उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता सीईटी जेईई या व्यावसायिक प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सुपर फिफ्टी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी 12 नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती. जाहीर झालेल्या निकालातून सुपर 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये ग्रामीण भागातील निवासी अथवा अधिवास दाखला, पालकांचे उत्पन्न एक लाखाच्या आत असल्याचा उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थी एसएससी जात प्रमाणपत्र इयत्ता 10 मध्ये 65 टक्के गुण मिळाल्याचे गुणपत्रक, शाळेचा दाखला, शिक्षण घेत असलेले महाविद्यालय अनुदानित किंवा अंशतः अनुदानित किंवा शासकीय आहे, याचा दाखला इत्यादी कागदपत्रे विद्यार्थ्यांकडून दाखल करून घेण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन मेसेजदेखील पाठविण्यात येणार आहे. याच वेळी गट शिक्षणाधिकार्‍यांमार्फत विद्यार्थ्यांचे काही कागदपत्रे शिल्लक राहिल्यास ते दाखल करून तपासणी करणार आहेत. या संदर्भात महाविद्यालयालाही मेसेज देण्यात येणार आहे.

सहा सदस्यांची निवड समिती स्थापन
कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सहा सदस्यांची निवड समिती स्थापन करण्यात आली असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हे समितीचे अध्यक्ष आहेत. याचबरोबर जिल्हा समाजकल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांचा समावेश आहे.

हेही वाचा:

Back to top button