FIFA World Cup BEL vs MOR : पराभवानंतर बेल्‍जियममध्‍ये फुटबॉल चाहत्‍यांचा उद्रेक, हिंसाचाराचा आगडोंब | पुढारी

FIFA World Cup BEL vs MOR : पराभवानंतर बेल्‍जियममध्‍ये फुटबॉल चाहत्‍यांचा उद्रेक, हिंसाचाराचा आगडोंब

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत मोरोक्कोकडून झालेला पराभव बेल्जियममधील फुटबॉल चाहत्‍यांच्‍या जिव्‍हारी लागला. बेल्‍जियमची राजधानी ब्रसेल्‍समध्‍ये त्‍यांच्‍या संतापाचा उद्रेक झाला. ( FIFA World Cup BEL vs MOR ) पराभवावर संताप व्‍यक्‍त करत रस्‍त्‍यावर उतरलेले फुटबॉल प्रेमी आणि पोलीस कर्मचारी भिडले. वृत्तसंस्‍था रॉयटर्सने दिलेल्‍या माहितीनुसार, या हिंसाचार प्रकरणी १२ हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.  संतप्‍त जमावाला शांत करताना पोलिसांची भलतीच तारांबळ उडाली.

FIFA World Cup BEL vs MOR : मोरोक्कोचा बेल्‍जियमला २-० गोलने धक्‍का

विश्वचषक स्पर्धेत रविवार २७ नोव्‍हेंबर रोजी मोरोक्को आणि बेल्जियम संघात सामना झाला. सामन्‍याच्‍या ७३ व्या मिनिटाला मोरोक्कोच्या अब्दुल हमीद साबरीने फ्री किकवर शानदार गोल करत संघाचे खाते उघडले. गोलची परत फेड करण्य़ासाठी बेल्जियमच्या खेळाडूंनी चढाया केल्या; पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. अधिकच्या वेळेत मोरोक्कोच्या झकेरिया अबू खलीलने सामन्याच्या ९०+३ व्या मिनिटाला गोल करत मोरोक्कोचा विजय निश्चित केला. संपूर्ण सामन्यात बेल्जियम संघाला सामन्यात अनेक चढाया करून एकही गोल करता आला नाही. हा सामना मोरोक्कोने २-० अशा फरकाने जिंकला.

राजधानी ब्रसेल्‍सच्‍या रस्‍त्‍यावर जाळपोळ

सामन्‍यात पराभव झाल्‍यानंतर बेल्‍जियमची राजधानी ब्रसेल्‍समध्‍ये चाहत्‍यांच्‍या संतापाचा उद्रेक झाला. चाहते रस्‍त्‍यावर उतरले. काही ठिकाणी त्‍यांनी वाहने पेटवून दिली. हिंसक जमावाला पांगविण्‍यासाठी पोंलिसांनी अश्रूधुरांच्‍या कांड्या फोडल्‍या. या वेळी समाजकटंकांनी फटाके फोडले, काठ्यांनी वाहने फोडत त्‍यांना आग लावली. रस्‍त्‍यांवर जाळपोळही केली. या हिंसाचार एक पत्रकार जखमी झाला आहे. एका समाजकंटकाला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणी १२ जणांहून अधिक जणांना ताब्‍यात घेतले आहे. या हिंसाचारामागील सूत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button