नाशिक : पेट्रोलपंप उदंड; सुविधा मात्र थंड | पुढारी

नाशिक : पेट्रोलपंप उदंड; सुविधा मात्र थंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागोजागी पेट्रोलपंप बघावयास मिळत असून, अजूनही मोक्याच्या भूखंडांवर पेट्रोलपंप उभारण्याचे काम नजरेस पडते. परंतु, पंप उभारताना ग्राहकांसाठी काही सुविधा उपलब्ध करून देणे पेट्रोलपंपचालकांना बंधनकारक असतानाही त्या दिल्या जात नसल्याचे चित्र जवळपास सर्वच पेट्रोलपंपांवर दिसून येते. खरं तर ग्राहकांनाच या सुविधांबाबत पुरेशी माहिती नसल्याने, पंपचालक या सुविधा उपलब्ध करून देण्याची तसदी घेताना दिसत नाहीत.

पेट्रोलपंपाची परवानगी देतानाच अत्यावश्यक सेवांबरोबरच ग्राहकांना विशेष सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक केले जाते. त्यामध्ये आपत्कालीन फोन कॉलपासून ते प्राथमिक उपचार किट तसेच इंधनाच्या गुणवत्तेची चाचणी प्रणाली उपलब्ध असायला हवी. मात्र, 99 टक्के पेट्रोलपंपावर या सुविधा उपलब्ध नाहीत. खरं तर सुविधा मागणे ग्राहकांचा अधिकार आणि हक्क आहे. परंतु, कोणीही याबाबत विचारणा करीत नसल्याने पेट्रोलपंपचालक देखील या सुविधा उपलब्ध करून देण्यास कुचराई करताना दिसतात.

शहरी भागातील काही पेट्रोलपंपांचा अपवाद वगळता बहुतांश पेट्रोलपंपांवर ग्राहकांसाठी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्राहकांचे हित जपण्यासाठी या सुविधा देणे आम्ही आमचे कर्तव्यच समजतो. – भूषण भोसले, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिशन.

जागो ग्राहक जागो…
एखाद्या वेळेस रस्त्यावर अपघात झाल्यास किंवा कोणती दुर्घटना झाल्यास त्या ठिकाणी मोफत फोन कॉल असायला हवा.
पंपावर ग्राहकांच्या नजरेस पडेल असा किमतीचा फलक असायला हवा.
शौचालयाची सुविधा असायला हवी. शौचालयात स्वच्छताही असायला हवी.
वाहनात मोफत हवा भरण्याची सोय असावी.
इंधनाच्या गुणवत्तेची चाचणी करणारी प्रणाली असावी.
अपघात किंवा दुर्घटना झाल्यास प्राथमिक उपचार किट असावे.
ग्राहकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी असावे.
ग्राहकांनी बिलाची मागणी केली असता, ते उपलब्ध करून द्यावे

हेही वाचा:

Back to top button