पुणे : सदनिकांचे दस्त ऑनलाइन प्राप्त झाल्यावर 24 तासांत नोंद होणार | पुढारी

पुणे : सदनिकांचे दस्त ऑनलाइन प्राप्त झाल्यावर 24 तासांत नोंद होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे आणि भाडेकरार या प्रकारचे दस्त ऑनलाइन प्राप्त झाल्यानंतर पुढील 24 तासांत ते नोंदविले गेले पाहिजेत. अन्यथा संबंधित दुय्यम निबंधकांवर कारवाई करण्यात येईल, असा आदेश नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी नोंदविलेल्या ऑनलाइन दस्तांची नोंदणी होऊन ते त्यांना आता तातडीने मिळू शकणार आहेत.

महाराष्ट्र नोंदणी अधिनियम, 1908 च्या कलम 34, 35 आणि 69 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र ई-रजिस्ट्रेशन आणि ई-फायलिंग नियमानुसार सन 2014 पासून दस्त नोंदणीसाठी ई-रजिस्ट्रेशन सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या ऑनलाइन सुविधेद्वारे विकासक आणि नागरिकांना सदनिकेचा प्रथम विक्री करारनामा (फर्स्ट सेल) आणि भाडेकरार दस्त नोंदणीसाठी ऑनलाइन सादर करता येतो. दुय्यम निबंधकांना या प्रणालीद्वारे प्राप्त झालेले दस्त तपासून त्याची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात येते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता दस्त नोंदणीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करता येत असल्यामुळे या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या सुविधेमुळे दस्त नोंदणी कार्यालयातील प्रत्यक्ष दस्त नोंदणीसाठी येणार्‍या नागरिकांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. परिणामी, दुय्यम निबंधकांना इतर दस्तांच्या नोंदणीकडे जास्त लक्ष देणे शक्य होत आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन दस्त नोंदणीसाठी सादर होणार्‍या दस्तांचा निपटारा तातडीने करणे ही नोंदणी अधिकार्‍यांची जबाबदारी आहे.

त्यामुळे ई-रजिस्ट्रेशन प्रणालीमधून नोंदणीसाठी दाखल होणार्‍या प्रथम विक्री करारनामे आणि भाडेकरार यांची ऑनलाइन दस्त नोंदणी त्याचदिवशी किंवा अपरिहार्य परिस्थितीत कामकाजाच्या दुसर्‍या दिवशी पूर्ण करण्यात यावी. यापेक्षा जास्त कालावधी लागता कामा नये. याबाबतच्या सूचना सर्व सह जिल्हा निबंधक व नोंदणी उपमहानिरीक्षक यांनी त्यांच्या कार्यालयांना द्याव्यात. ऑनलाइन दस्तांची नोंदणी विहित कालावधीत म्हणजेच कामकाजाच्या 24 तासांत न झाल्यास संबंधित दुय्यम निबंधकावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही उपमहानोंदणी निरीक्षक गोविंद कराड यांनी नमूद केले आहे

Back to top button