पालकमंत्री भुसे : परस्पर समन्वयातून काम करावे | पुढारी

पालकमंत्री भुसे : परस्पर समन्वयातून काम करावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम करावे. तसेच आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती देणारे शहरी व ग्रामीण भागासाठी दोन स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. 3) विविध योजनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी ना. भुसे बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, मालेगाव मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी शहरी व ग्रामीण भागासाठी प्रत्येकी एक कक्ष स्थापन करावे. यात आरोग्यमित्रांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच या कक्षाला टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डवाटपसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी व आशासेविका, तर शहरी भागात वॉर्ड अधिकारी यांची मदत घ्यावी. ज्या नगर परिषदा व तालुक्यांची कामे 50 टक्क्यांपेक्षा कमी आहेत, त्यांनी येणार्‍या काळात 100 टक्के कामे पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही ना. भुसे यांनी केल्या.

पालकमंत्र्यांचे निर्देश…
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील कामांना गती द्यावी. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण झालेल्या पाच वर्षांआतील कामांची देखभाल, दुरुस्ती करावी. त्यापेक्षा अधिक कालावधी झालेल्या कामांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा. शेतकरी सन्मान योजनेत शेतकर्‍यांचे ई-केवायसी प्रलंबित राहणार नाही, यासाठी नियोजन करावे. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी 50 हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी आदी निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.

हेही वाचा:

Back to top button