अकोला: व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणी ५ जणांना अटक | पुढारी

अकोला: व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणी ५ जणांना अटक

अकोला, पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कारसह दोन देशी पिस्टल पोलिसांनी जप्त केले आहेत. तर अपहरण झालेले व्यापारी गुरूवारी रात्री त्यांच्या घरी सुखरूप पोहोचले होते. १ कोटीच्या मागणीसाठी हे अपहरण करण्यात आले होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील व्यापारी अरुणकुमार वोरा १३ मे रोजी त्यांचे दुकान बंद करून घरी जात होते. यावेळी अज्ञात दोन ते तीन जणांनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांचे अपरहण केले होते. याप्रकरणी रामदास पेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी व्यापारी अरुणकुमार वोरा यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने दोन पथक तयार केले होते. गोपनीय माहिती व्दारे १५ मेरोजी संशयितांच्या पत्यावर जावून त्यांचा शोध घेतला असता, ते मिळून आले नाहीत.

दरम्यान, अपहरण केलेले अरुणकुमार वोरा त्यांच्या घरी परत आलेले आहेत. अपहृत अरुणकुमार वोरा यांच्या घरी जावून त्यांची विचापूस केली असता त्या ठिकाणी त्यांचे कडून माहिती मिळाली की, त्यांना कान्हेरी सरप येथे एका घरात कोंडून ठेवले होते. अपहरण करणाऱ्या आरोपीनेच त्यांना धमकी देवून अॅटोमध्ये बसवून अकोलाकडे पाठविले. कान्हेरी येथील संशयित असल्याबाबत माहिती मिळाल्यानुसार संशयितांचा पुन्हा शोध घेवून यापैकी ५ जणांना पोलिसांनी अटक केली. सर्वांनी कट रचून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

अरुणकुमार वोरा हे कान्हेरी सरप येथे असताना संशयितांना पोलीस आपल्या मागावर असल्याची खात्री झाली. त्यांनी वोरा यांना ॲटोने घरी पाठविले होते. ज्या अॅटोने अरुण वोरा घरी आले, त्या अॅटोचालकाला स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी ताब्यात घेऊन गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणावरून सकाळी पाचपर्यंत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले २ देशी पिस्टल, वाहन, मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी मिथुन ऊर्फ मोंटी सुधाकर इंगळे, किशोर पुंजाजी दाभाडे, फिरोज खान युसूफ खान, शरद पुंजाजी दाभाडे, आशिष अरविंद धनबहादुर या सर्व आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button