पुणेवाडीत बिबट्याचा तिघांवर हल्ला | पुढारी

पुणेवाडीत बिबट्याचा तिघांवर हल्ला

पारनेर :  पुढारी वृत्तसेवा : पुणेवाडी येथे बुधवारी (दि.2 ) संध्याकाळी 7 वाजता शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तीन व्यक्तींवर बिबट्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाची माहिती घेऊन पिंजरे वाढविले आहेत. बुधवारी सायंकाळी सात वाजता पुणेवाडी-पारनेर रस्त्यावरून घरी जाताना पद्ममावती मंदिराजवळ बिबट्याने किसन कारभारी रेपाळे (वय 65 ) यांच्यावर व चंद्रभागा तुळशीराम रेपाळे (वय 60), यमुना भाऊ पोटे या तिघांवर हल्ला केला. त्यात त्यांच्या हाताला बिबट्याने चावा घेतला. ते पाहून चंद्रभागा तुळशीराम रेपाळे यांनी बिबट्याला फावडे फेकून मारले. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर धाव घेतली. त्या खाली पडल्याने त्यांचा रक्तदाब वाढला. घटनास्थळास वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे, वनपाल पी.व्ही.सोनवणे, वनरक्षक फारुक शेख यांनी भेट देत जनजागृती केली.

वनपरिक्षेत्र अधिकार्‍याबाबत नाराजी
परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. येथे पिंजरे लावण्यात आले. मात्र. त्यात बिबट्या अद्यापि कैद झाला नाही. बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

सध्या पुणेवाडी येथे रात्रीचा वीजपुरवठा भारनियमनामुळे बंद आहे. परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने व नुकताच बिबट्याने हल्ला केल्याने भीतीचे वातावरण आहे. रात्रीचे भारनियमन रद्द करावे.
                                                  – बाळासाहेब रेपाळे सरपंच, पुणेवाडी

Back to top button