नगर : कचरा ढीग, उघड्या गटारी अन् पथदिवे बंद ! जेऊरची विदारक परिस्थिती | पुढारी

नगर : कचरा ढीग, उघड्या गटारी अन् पथदिवे बंद ! जेऊरची विदारक परिस्थिती

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी जेऊर येथील संतप्त ग्रामस्थ करीत आहेत. गावात सर्वत्र कचर्‍याचे ढीग, उघड्या गटारी, पथदिवे बंद, विजेचा लपंडाव, अतिक्रमणे, पाण्याची समस्या अशा विविध समस्यांनी त्रस्त झालेले ग्रामस्थ, त्यातच सुस्थावलेले ग्रामपंचायत पदाधिकारी, अशी विदारक परिस्थिती जेऊरमध्ये उद्भवली आहे. निवडणुकीत मतदारांनी तरुणांच्या हातात मोठ्या विश्वासाने सत्तेची सूत्रे दिली. गावाचा विकास होईल, जेऊर गावचा कायापालट होऊन गावाचा नावलौकिक करतील. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होईल. विविध विकासात्मक निर्णय घेऊन गावाचे नाव रोशन करतील, अशी भोळी भाबडी आशा ग्रामस्थांमध्ये होती. परंतु सरपंच, उपसरपंच निवडीच्या दिवशीच लगेच एका ग्रामपंचायत सदस्याने राजीनामा दिला अन् तिथेच ग्रामस्थांना पुढे काय घडणार, याची शंका आली.

नंतर ग्रामपंचायत सदस्यांमध्ये गट पडले. गावविकासाच्या कामात गट तट पडल्याने गावची प्रगतीच खुंटली. ग्रामपंचायत सदस्य आपापल्या सोयीनुसार प्रभागातील कामे ग्रामपंचायतीकडे सांगू लागले. एकिकडे नागरिकांची ओरड, तर सुरूच होती. गाव विकासाबाबत गेल्या दीड वर्षात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांमध्ये असणारा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. ग्रामपंचायत सदस्यांमध्येच ताळमेळ नसल्याचे पाहून ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीकडून होणार्‍या कामांची अपेक्षा सोडून दिली. निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या कौलाची आज आम्हाला किंमत मोजावी लागत आहे, असे ग्रामस्थ उघडपणे बोलत आहेत.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी काढलेले छायाचित्र वृत्तपत्रात छापून जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा वादही सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. जे छायाचित्र वृत्तपत्रात छापून गाव विकासाबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्याला ग्रामस्थ साक्षीदार आहेत. ते छायाचित्र सहा महिन्यांपूर्वीचे असून कोणीही चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करून ग्रामस्थांची दिशाभूल करू नये, असा सज्जड इशारा खुद्द ग्रामपंचायत सदस्याने दिल्याने ग्रामपंचायत मधील कारभाराचे संपूर्ण पितळ उघडे पडले आहे.

ग्रामसेवक मर्जीतला हवा, असे वृत्त प्रकाशित करण्यात आले पण ग्रामसेवक कोणाला अन् कशासाठी आपल्या मर्जीतला हवा आहे, ते स्पष्ट करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच ग्रामपंचायत पातळीवरील सर्व स्थानिक समितीचे अध्यक्षपद हे नियमानुसार सरपंचाकडे असणे आवश्यक आहे. परंतु जेऊर पाणीपुरवठा समितीचे अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य गणेश तवले यांची नियुक्ती करण्यात आली. तवले यांचे पाण्याबाबतचे कार्य चांगलेही राहिले आहे. पण नियमानुसार त्यांना अध्यक्ष पद देता येत नाही. एवढी साधी गोष्ट देखील ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना माहित नसल्याने यातून त्यांचे अज्ञान व बालिशपणा दिसून येत आहे. ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी परखड भूमिका घेत पदाधिकार्‍यांना चांगलेच खडे बोल सुनावले होते.

ग्रामपंचायतीचा कारभार आणि सर्वच पदाधिकार्‍यांबाबत आता ग्रामस्थांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. विद्यमान उपसरपंच तसेच काही ग्रामपंचायत सदस्यांनी विकास कामे होत नसल्याने राजीनामा देणार असल्याचे सांगितले. यावरून ग्रामपंचायत सदस्य देखील हतबल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या गलथान कारभाराला वैतागून ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नियुक्त करावा व ग्रामपंचायतचा कारभार पाहावा, अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

विरोधक झाले अचानक गायब
पूर्वी जेऊर ग्रामपंचायतीमध्ये दररोज विविध विषय घेऊन माहितीचा अधिकार, तक्रारअर्ज घेऊन आरडाओरड करणारे विरोधक अचानक गायबच झाले आहेत. ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकार्‍यांना धारेवर धरत कार्यालयात रोजच गोंधळ घालणारे विरोधक अचानक गायब कसे झाले. यामागील गौडबंगाल काय? हादेखील प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

ग्रामपंचायतीत पतिराजांच्या करामती
ग्रामपंचायतमधील पतीराज संपुष्टात येणे गरजेचे आहे. परंतु तसे न होता आजही बिनदिक्कतपणे अनेक महिला पदाधिकार्‍यांचे पती ग्रामपंचायतीत शासकीय कामात ढवळाढवळ करीत आहेत. काही पतीराजांनी तर आपली ‘परिसीमा’ ओलांडत अनेक उद्योग केले आहेत. त्याचे ते पुरावे देखील ‘पुढारी’च्या हाती आले असून, त्याचा लवकरच भांडाफोड करण्यात येणार आहे.

‘पुढारी’वर कौतुकाचा वर्षाव
जेऊर ग्रामपंचायतीमधील सावळ्या गोंधळाचा भांडाफोड करण्याचे काम ‘पुढारी’ने केले. त्यामुळे जेऊर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटत, तसेच फोन द्वारे ‘पुढारी’चे कौतुक केले आहे. निर्भीडपणे ‘पुढारी’ने जेऊर गावातील वास्तविकता जनतेसमोर आणली असून, अशा स्वरूपाच्या पत्रकारितेची आज गरज असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

Back to top button