नाशिक विभागातील 456 उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप | पुढारी

नाशिक विभागातील 456 उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये राज्यभरात 75 हजार उमेदवारांना रोजगार देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ होत असून, नाशिक विभागात 456 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करून जनतेची सेवा करावी, असे आवाहन बंदरे व खनिकर्ममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना ना. भुसेंच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात गुरुवारी (दि. 3) आयोजित रोजगार मेळाव्यात ना. भुसे बोलत होते. याप्रसंगी आमदार सीमा हिरे व देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, उपआयुक्त (महसूल) उन्मेष महाजन, एसटीचे प्रादेशिक उपमहाव्यवस्थापक नितीन मैंद उपस्थित होते. ना. भुसे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचार व कार्यातून समाजाच्या उन्नतीसाठी रयतेच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शासनाने राज्यात 75 हजार तरुणांच्या हाताला काम देण्याचे ठरवले आहे. विभागातून 456 तरुणांना रोजगार मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यासाठी आजचा शुभ दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य परिवहन विभाग, महावितरण कंपनी, नगरपालिका या विभागांतील उमेदवारांना आज नियुक्ती देण्यात आल्या. महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहायकपदी महिलांना मिळालेली संधी यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले की, महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. नवनियुक्त उमेदवारांनी चांगली सेवा देत व्यसनापासून लांब राहावे, अशी सूचना ना. भुसेंनी केली. येत्या काळात आपण सर्व जण समन्वयाने काम करून नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू या, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या मराठीतून शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारच्या रोजगार मेळाव्याअंतर्गत उमेदवारांना नियुक्तिपत्र वितरण उपक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी खास मराठी भाषेतून शुभेच्छा देताना उमेदवारांनी जनतेचे सेवक म्हणून कार्य करावे, असे आवाहन केले. पंतप्रधानांनी मराठीतून दिलेल्या शुभेच्छा संदेशावेळी सभागृहात टाळ्यांच्या कडकडाट करण्यात आला.

एक हजारांहून अधिक नेमणुका’

नाशिक विभागात राज्य शासनाच्या तसेच महामंडळाच्या आस्थापनांमध्ये निवड होऊन पात्र ठरलेल्या एकूण 456 उमेदवारांना आज नियुक्ती आदेश देण्यात येत आहेत. कोविडमुळे अनुकंपा भरतीची प्रलंबित असलेल्या प्रकरणांची कार्यवाही पूर्ण करून 536 अनुकंपाधारकांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विभागात जवळपास एक हजारांहून अधिक उमेदवारांना नेमणुका दिल्याची माहिती राधाकृष्ण गमे यांनी दिली. नियुक्त उमेदवारांनी भरीव योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

Back to top button