नाशिक : द्वारका येथील भुयारीमार्ग समस्यांच्या गर्तेत | पुढारी

नाशिक : द्वारका येथील भुयारीमार्ग समस्यांच्या गर्तेत

जुने नाशिक : अब्दुल कादिर
द्वारका चौकात वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याकरिता 2013 साली कोट्यवधी रुपये खर्च करून पंचमुखी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. परंतु रचनेत अभियांत्रिकी चुका, अस्वच्छतेचे प्रश्न, भुयारी मार्गाचे मोठे अंतर, वर्दळ नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न, पावसाळ्यात भरणारे पाणी या बाबींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मार्गाचा वापर करण्यास नागरीक अनुत्सुक असल्याने या मार्गाची अवस्था असून खोळंबा नसून अडचण अशी झाली आहे.

या भुयारी मार्गावर नियमित सफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यामुळे नागरिकांकडून या मार्गाचा वापर टाळला जात आहे. विशेष म्हणजे भुरट्यांकडून भुयारी मार्गाचा वापर चक्क मुतारी म्हणून केला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यात पावसाळ्यात भरणार्‍या पाणीचा प्रश्नही कायमच आहे. या मार्गावर एकूण पाच ठिकाणी जाण्याऐण्याची सुविधा आहे. यातील अमरधामकडे जाणार्‍या रस्त्यालगत व ट्रॅव्हल्स मार्केटसमोर हे दोन्ही द्वार दूषित पाणी जमल्यामुळे बंद आहे. या समस्यांकडे प्रशासनानेविशेष लक्ष देऊन नागरिकांना भुयारी मार्गाचा वापर करण्यास प्रवृत्त करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. द्वारका चौक म्हणजेच शहरातील एक अत्यंत वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथे शहराच्या बाहेर कोणत्याही दिशेला जाण्यास दळणवळणाची साधने उपलब्ध असल्यामुळे या भागात स्थानिक व बाहेरून येणारे यात्रेकरू व प्रवासी आपले सामानासोबत मोठ्या प्रमाणात रस्ते ओलांडताना दिसतात. असे असताना भुयारी मार्गातील समस्येमुळे या मार्गाचा वापर होत नसल्याचे वास्तव आहे. येथील वाहतुकीचा विचार करता नागरिकांना रस्ता ओलडतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यापूर्वी येथे अनेक अपघातात होऊन नागरिकांना जीवही गमवावा लागलेला आहे. यापूर्वी भुयारी मार्ग गर्दुल्ले, दारुडे, नशेबाजांचा अड्डा बनल्याने जून 2016 मध्ये यास कुलूप लागले होते. नंतर नागरिक व समाजसेवी संस्थांच्या सततच्या मागणीमुळे फेब्रुवारी-2020 साली पुन्हा सुरु करण्यात आला. ठिकठिकाणी जमलेला घाण कचरा, अंधुक व खराब झालेल्या दिव्यांमुळे पडलेला अंधार, छतावर लागलेले जाळे, हवा खेळण्यासाठी बनवलेल्या खिडक्यात अडकलेल्या कचर्‍यामुळे ताज्या हवेचा अभाव व जमलेल्या सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे गुदमरल्यासारखी भावना अशा अनेक कारणांमुळे बहुतांश पादचारी भुयारी मार्गाचा वापर करत नाहीत.

द्वारका भुयारी मार्गाची रचना अशी…
एकूण पाच ठिकाणी प्रवेश व बाहेर जाण्यास सुविधा असलेला द्वारकावरील हा भुयारी मार्ग असून त्याचा एक भाग बिझनेस पार्क जवळ, दुसरा भाग गजानन चहा जवळ, तिसरा भाग द्वारका पोलिस चौकीलगत, चौथा भाग अमरधामकडे जाणार्‍या रस्त्यावर तर पाचवा भाग ट्रॅव्हल्स मार्केट समोर आहे. या पाचही ठिकाणावर भुयारी मार्गात जाता येते किंवा या ठिकाणांहून बाहेर पडता येते. हा भुयारी मार्ग लांबी आणि रुंदीच्या दृष्टिकोनातून शहरातील सर्वात मोठा भुयारी मार्ग ठरतो.

हेही वाचा:

Back to top button