नाशिक : मनपात 456 पदांची जम्बो भरती | पुढारी

नाशिक : मनपात 456 पदांची जम्बो भरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागापाठोपाठ वैद्यकीय विभागासाठीच्या सेवा प्रवेश नियमावलीला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिल्याने वैद्यकीय विभागामार्फत सुरू असलेल्या 45 डॉक्टरांची मानधनावरील भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्याचबरोबर अग्निशमनच्या 208 फायरमन पदासोबतच वैद्यकीय विभागातील 81 डॉक्टरांच्या पदांसह 248 पदांसाठी कायमस्वरूपी भरती करण्याचा निर्णय घेतल्याने, नोव्हेंबरपासून महापालिकेत 456 पदांची जम्बो भरती मोहीम राबविली जाणार आहे.

टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थांच्या मार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. गेल्या 24 वर्षांपासून नाशिक महापालिकेत कुठल्याही प्रकारची भरती झालेली नाही. नाशिक महापालिकेचा ‘ब’ संवर्गात समावेश होऊन आठ वर्षे उलटली असली तरी जुन्या ‘क’ संवर्गानुसारच आस्थापना परिशिष्ट कार्यरत आहे. या आस्थापना परिशिष्टावरील मंजूर 7,082 पदांपैकीही तब्बल 2,700 पदे रिक्त असल्याने जेमतेम 4,400 अधिकारी, कर्मचार्‍यांमार्फत महापालिकेचा कारभार सुरू आहे. त्यामुळे अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येत आहे. आस्थापना खर्च 35 टक्क्यांवर गेल्यामुळे महापालिकेला रिक्त पदांच्या भरतीलादेखील शासनाकडून परवानगी मिळत नव्हती. कोरोना काळात आपत्कालीन परिस्थितीत बांधकाम, आरोग्य, वैद्यकीय आणि अग्निशमन विभागातील 875 नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली. परंतु, सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे या पदांच्या भरतीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे महापालिकेने वैद्यकीय विभागाची गरज लक्षात घेता,या विभागात 45 डॉक्टरांची मानधनावर भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठीची प्रक्रियादेखील राबविली होती. दरम्यान, या भरती प्रक्रियेमुळे वैद्यकीय विभागातील मनुष्यबळाची कमतरता भरून निघणार आहे.

टीसीएस, आयबीपीएसमार्फत भरती…
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्षेत्राबाहेरील गट ‘ब’ (अराजपत्रित), गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील पदांकरिता टीसीएस, आयबीपीएस मार्फत भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार महापालिकेतील या पदाची भरती प्रक्रियादेखील टीसीएस, आयबीपीएस मार्फत राबविण्याचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात असून, नोव्हेंबरमध्ये फायरमन पदासोबतच वैद्यकीय विभागातील 81 डॉक्टरांसह 248 पदांसाठीची जाहिरात काढली जाणार आहे.

हेही वाचा:

Back to top button