ग्रामपंचायत : 13 कोटींची थकबाकी; वसुलीसाठी जि. प. कडून प्रयत्न | पुढारी

ग्रामपंचायत : 13 कोटींची थकबाकी; वसुलीसाठी जि. प. कडून प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेंतर्गत विविध विकासकामांसाठी देण्यात येणार्‍या कर्जाची परतफेड वेळेत झाली नसून, आता हा आकडा 13 कोटींवर गेला आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी आता जिल्हा परिषद प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. गत आठवड्यात सिन्नर तालुक्यातील वडांगळी ग्रामपंचायतीने 100 टक्के वसुली केली आहे. यातील काही ग्रामपंचायती सध्या महापालिका, नगर परिषदा तसेच नगरपालिका यांच्यात विलीन झालेल्या असल्याने ही थकबाकी वसूल करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन त्यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहे.

जिल्हाभरातून 11 तालुक्यांतील 68 ग्रामपंचायतींनी अद्याप कर्जाची परतफेड केलेली नाही. यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या तालुक्यांमध्ये सिन्नर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींकडे 2 कोटी 42 लाख 54 हजार 934 रुपये थकीत असून, 11 तालुक्यांत सिन्नर तालुक्याचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर बागलाण तालुक्यात 2 कोटी 30 लाख 9 हजार 404 रुपये, मालेगाव तालुक्यात 1 कोटी 82 लाख 41 हजार 888 रुपये, निफाड तालुक्यात 1 कोटी 67 लाख 28 हजार 663 रुपये, दिंडोरी तालुक्यात 1 कोटी 35 लाख 53 हजार 811 रुपये, चांदवड तालुक्यात 55 लाख 88 हजार 727 रुपये, येवला तालुक्यात 44 लाख 41 हजार 272 रुपये, नांदगाव तालुक्यात 30 लाख 96 हजार 575 रुपये, देवळा तालुक्यात 23 लाख 59 हजार 796 रुपये आणि कळवण तालुक्यात 4 लाख 36 हजार 735 रुपये या तालुक्यांचा क्रमांक लागतो.

मखमलाबादचा पेच…
या कर्जांचे वितरण होऊन अनेक वर्षे झाली आहेत. यात सर्वांत जुने कर्ज वितरण 9 नोव्हेंबर 1977 रोजी 23 हजार रुपयांचे मखमलाबाद ग्रामपंचायतीला झाले आहे. मात्र, आता मखमलाबाद गावाचा समावेश महापालिका कार्यक्षेत्रात झाला आहे. त्यामुळे त्यांची 15 हजार 843 रुपयांची थकबाकी त्यांनी महापालिकेकडे भरावी, याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे.

या आहेत कर्ज थकीत ग्रामपंचायती…
बागलाण : लखमापूर, मुल्हेर, खिरमाणी, नामपूर, जोरण, अजमेर सौंदाणे, वीरगाव, वायगाव, तळवाडे (दि.), आराई
चांदवड : आसरखेडे, चांदवड, वाहेगावसाळ
नांदगाव : वाखारी, पानेवाडी
नाशिक : मखमलाबाद, अंबड खु., ओढा, चांदशी, पिंप्री सय्यद
सिन्नर : सोनांबे, पाथरे बु., पाथरे बु.-2, सोमठाणे, मनेगाव, मुसळगाव, पाथरे, वारे, गोंदे, वावी, माळेगाव
निफाड : साकोरे, शिवडी, ओझर मिग – 3, रानवड, खडक माळेगाव, शिंगवे, साकोरे मिग, सायखेडा, दावचवाडी, नांदुर्डी, लासलगाव, करंजगाव, खेडे
दिंडोरी : बोपेगाव, लखमापूर-3, तिसगाव, वरखेडा, सोनजांब, करंजवण
मालेगाव : करंजवण -1, करंजगव्हाण – 2, दाभाडी – 3, नीळगव्हाण, नांदगाव बु., मुंगसे, टेहरे, वडेल, झोडगे, चंदनपुरी, टोकडे, रावळगाव
कळवण : अभोणा 2, सप्तशृंगगड
देवळा : उमराणे, वासूळ, वासोळ
येवला : आडबाव

थकबाकी वसुलीसाठी मीटिंगा घेतल्या जात आहेत. ज्या ग्रामपंचायती या नगरपालिका, नगर परिषद यांच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत, त्यांचा पत्रव्यवहार पूर्ण झाला आहे. महापालिका क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायतींबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने पत्रव्यवहार केला जाणार आहे. – रवींद्रसिंह परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.

हेही वाचा:

Back to top button