छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे होणार प्रकाशन, 'हे' आहे निमित्त
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. छगन भुजबळ यांचा दि. 15 ऑक्टोबर रोजी 75 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीतर्फे राष्ट्रवादी काँंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती छगन भुजबळ गौरव समितीचे समन्वयक खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली. छगन भुजबळ गौरव समितीने आयोजित केलेल्या अमृतमहोत्सवी सोहळ्यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जम्मू अॅण्ड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला, प्रज्ञावंत लेखक-कवी डॉ. जावेद अख्तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान व विजय सावंत यांनी लिहिलेल्या छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित 75 निवडक छायाचित्र पुस्तिका-फोटो बायोग्राफीचेदेखील प्रकाशन करण्यात येणार आहे.
या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभर सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. छगन भुजबळ गौरव समितीमध्ये समन्वयक खा. प्रफुल्ल पटेल तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. कपिल पाटील, आ. सचिन अहिर यांचा समावेश आहे.