पिंपरी : खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची ‘हंगामी लूट’ | पुढारी

पिंपरी : खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची ‘हंगामी लूट’

राहुल हातोले
पिंपरी : अवघ्या दोन आठवड्यांवर येवून ठेपलेल्या दीपावलीनिमित्त शहरातील चाकरमाने तसेच इतरही अनेक जण सण साजरा करण्यासाठी गावी जाण्याचा बेत आखतात. त्यासाठी एस. टी. बसचे अथवा खासगी ट्रॅव्हल्सचे बुकिंग केली जाते; मात्र सणासाठी गावी जाणार्‍यांची संख्या लक्षात घेता खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ करून प्रवाशांची हंगामी लूट सुरू असल्याचे चित्र आहे.

खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून दिवाळी सणासाठी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केली जाते. प्रवाशांकडून एरवीपेक्षा दुपटीहून अधिक पटीने भाडे आकारले जाते. परिवहन विभागाच्या नियमांना केराची टोपली दाखवून महिनाभरापासूनच ही भाडेवाढ सुरू झाली आहे. आता दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेला हा सण पाहता पुन्हा यामध्ये आणखी भाडेवाढ होण्याची दाट शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रोजगार आणि शिक्षणासाठी आलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खान्देश आदी भागांमधून आलेले नागरिक सणासुदीसाठी आपल्या घरी जाण्यासाठी गाड्यांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग करतात. लोकांची अडचण पाहून खासगी ट्रॅव्हल्स बस अधिक भाडेवाढ करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आले आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपर्‍यांतून नागरिकांनी येथे वास्तव्य केले आहे. तसेच शिक्षणाचे माहेरघर असल्याने मोठ्या प्रमाणात पिंपरी-चिंचवड शहरात विद्यार्थ्यांचे वास्तव्य आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश आदी भागातील नागरिक सणासुदीसाठी आपल्या घरी जाण्यासाठी वाटेल तेवढा पैसा मोजण्यास तयार होतात. लोकांच्या याच भावनेचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सचे मालक अधिक भाडेवाढ करून लोकांची लूट करीत आहेत.

परिवहन विभागाचा नियम
खासगी ट्रॅव्हल्स बसला एसटी बसच्या दीडपटीने भाडेवाढ करता येऊ शकते. मात्र, याहून अधिक भाडेवाढ करत असल्यास नियमांचे उल्लंघन समजण्यात येईल.

सर्रासपणे ऑनलाईनद्वारे वाढीव दराने तिकिटांची विक्री
प्रादेशिक परिवहन विभागाची तमा न बाळगता त्यांच्या नियमांना डावलून ऑनलाईनद्वारे एरवी आठशे रुपये असलेले तिकीट तीन ते चार हजार रुपये दराने सर्रासपणे विक्री केली जात आहे.

दिवाळीसाठी तिकीट बूक करायला गेल्यानंतर आत्ताच बुकिंग चालक तिकीट बूक झाल्याचे सांगतात. आपल्यासमोर मुद्दाम फोन करून विचारतात आणि शेवटच्या सीट उपलब्ध असल्याचे सांगून नेहमीपेक्षा तिपटीने भाडे आकारत आहेत.

                                                                                         -एक त्रस्त प्रवासी

एसटीच्या दीडपट एवढेच भाडेवाढ खासगी ट्रॅव्हल्स बस करू शकतात. मात्र याहून अधिक भाडेवाढ करणार्‍या खासगी वाहनांवर कारवाईचे आदेश आहेत. याबाबत माहिती असल्यास परिवहन विभागाला कळविल्यास कारवाई करण्यात येईल.

                            – मनोज ओतारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिं. चिं.

मार्ग खासगी ट्रॅव्हल्स (नेहमीचे भाडे) एसटी (नेहमीचे भाडे) दिवाळीनिमित्त खासगीचे भाडे
पुणे-अमरावती 900 1000 2300
पुणे -सोलापूर 400 300 700
पुणे – अंमळनेर 400 590 750
पुणे – अकोला 600 750 2000

Back to top button