नाशिक : नांदगांव तालुक्यात नद्यांना महापूर, मोठे नुकसान | पुढारी

नाशिक : नांदगांव तालुक्यात नद्यांना महापूर, मोठे नुकसान

नांदगांव; मारुती जगधने : तालुक्यात सर्वत्र महापूर येऊन कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. नांदगांव शहरात पाणी शिरले असून व्यवसायिकांचे व घरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

शाकंबरी नदीच्या शनीमंदिराजवळील ४ मोऱ्या बंद असल्याने पुलावरून सुमारे पाच फूट पाणी बाहेर पडले. तसेच गांधी, फुले, अहिल्यादेवी चौकात पुराचे पाणी शिरुन प्रचंड नुकसान झाले आहे.

रात्री १०.३० वाजता मोरखडी बंधारा फुटला. यामुळे सुरसे वस्तीत व शेतात पाणी शिरले. शेत शिवारांनी नदीचे रुप धारण केले. यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

आ. सुहास कांदे यांनी प्रशासनाला पाहणी करुन तातडीची मदत व पंचनामे करण्याच्या सुचना केल्या आहेत. तालुक्यात महापुराने हाहाकार उडवून दिल्याने कोट्यवधीचे नुकसाने झाले आहे.

शाकंबरी, लेंडी, मोरखडी, पांझन, मण्याड नद्यांसह नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. शाकंबरी नदीपात्रात रात्री एकजण वाहून गेल्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे. चौथ्या दिवशी देखील पावसाची संततधार चालूच होती. शिवाय वीज खांब पडून नुकसान झाले आहे. यामुळे वीजपुरवठा बंद होता.

साकोरा- मोरखडी उपनदीच्या महापुराने बंधारा फुटला आहे.

धोक्याची सूचना…

नांदगाव शहरातून वाहणाऱ्या शाकंभरी नदीला पूर आला असून लेंडी नदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. तसेच दहेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने सर्व नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे व आपले सामान सामुग्री देखील सुरक्षित ठेवावी. कोणीही व्यक्ती पुराच्या पाण्यात उतरू नये ही विनंती.कोणीही आपत्कालीन परिस्थितीत अडकल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधावा.
– नांदगाव नगरपरिषद

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button