

इस्तंबुल : तुर्कीच्या इस्तंबुलमध्ये रेड बुल टीमशी निगडित इटलीचा डेअर डेव्हिल पायलट डारियो कोस्टा याने अनोखा विश्वविक्रम केला. त्याने तेथील 360 मीटर लांबीच्या बोगद्यात तीन फूट उंचीवरून विमान उडवले.
त्यानंतर 1160 मीटर लांबीच्या दुसर्या बोगद्यालाही अशाच प्रकारे पार केले. या काळात विमानाने 5200 फुटांचे अंतर पार केले. कोस्टा याने 'जिव्को एज 540' हे रेस प्लेन उडवत हा विक्रम केला.
विशेष म्हणजे या विमान उड्डाणासाठी त्याला अवघे 43.44 सेकंद लागले आणि विमानाचा वेग ताशी 150 किलोमीटर होता. यावेळी त्याने एकूण पाच विक्रमांची नोंद केली.
त्यामध्ये प्रथमच बोगद्यामधून उड्डाण करणे, बोगद्यातील सर्वात लांब उड्डाण, भक्कम भिंतींमधून सर्वात लांब उड्डाण, दोन बोगद्यांमधून विमानाचे पहिले उड्डाण आणि एखाद्या बोगद्यामधून विमानाचे टेक ऑफ करण्याच्या विक्रमाचा समावेश आहे.
अर्थातच एखाद्या बोगद्यासारख्या अरुंद जागेवरून उड्डाण करणे हे जोखमीचे तसेच कौशल्याचे काम आहे. मात्र, या इटालियन पायलटने हे करून दाखवले आणि एक-दोन नव्हे तर पाच विक्रमांची गिनिज बुकमध्ये नोंद केली!