नंदुरबार : एकामागोमाग तीन बैल दगावले; पशुपालक हादरले | पुढारी

नंदुरबार : एकामागोमाग तीन बैल दगावले; पशुपालक हादरले

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक चिंतेत असतांनाच नंदुरबार जिल्ह्यात वाण्याविहीर येथे एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यातील तीन बैल एकाचवेळी अचानक दगावल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात लम्पीचे तुरळक प्रकार आढळले असले तरी तिनही बैलांचे मृत्यू लम्पीमुळे झाल्याचे अद्याप तरी सिद्ध झालेले नाही.

लम्पी जनावराच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. अशातच अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील जर्मनसिंग गुलाबसिंग पाडवी यांच्या मालकीचे तीन बैल दोन दिवसांपूर्वी गोठ्यातच एकामागे एक ताबडतोब दगावले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तिन बैल नेमके कशामुळे दगावले याबाबत संभ्रम आहे. तिन्ही बैलांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करण्यात आले व ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी पाटील यांनी सांगितले. त्यानंतरच तिन्ही बैलांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यात लम्पी जनावरांच्या संसर्गजन्य आजाराची लागण निदर्शनास आल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. त्यातच अशाप्रकारे अचानकपणे जनावरे दगावल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुवैद्यकीय स्तरावर परिसरातील व तालुक्यातील जनावरांची योग्य ती काळजी घेऊन लम्पीचे देखील लसीकरण होणे गरजेचे आहे. तशा प्रकारची खबरदारी पशु मालकांनी घेणे आवश्यक आहे. लवकरात लवकर संबंधित विभागाकडून जनावरांचे लसीकरण तातडीने करून घेण्यात यावे. जेणेकरून पशुपालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button