पिंपरी : तरुणाचे अपहरण; गुगल पेवर घेतले दोन हजार | पुढारी

पिंपरी : तरुणाचे अपहरण; गुगल पेवर घेतले दोन हजार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तरुणाचे दुचाकीवर बसवून अपहरण केले. त्यानंतर त्याच्या ‘गुगल पे’वरून दोन हजार रुपये घेऊन आरोपी फरार झाले. ही घटना गुरुवारी (दि. 15) रात्री पिंपरी येथे घडली. सुयश प्रमोद पाटील (21, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास अशोकनगर सहकारी बँकेच्या समोरून वल्लभनगर येथून चालत जात होते. त्यावेळी तिथे आलेल्या तिघांनी फिर्यादी यांना डोळ्यावर, पाठीत, पोटात मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीवर बसवून त्यांना वायसीएम हॉस्पिटलसमोर नेले. तेथे फिर्यादी यांचा मोबाईल ताब्यात घेऊन ‘गुगल पे’वरून जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेत आरोपी पळून गेले. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button