धुळ्यात देवाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल | पुढारी

धुळ्यात देवाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

धुळे: पुढारी वृत्तसेवा

धुळ्यातील साक्री रोडवर असलेल्या महाले नगरातील श्री मारुती मंदिरातील मूर्तीचा चांदीचा एक डोळा चोरीला गेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञाताने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्याला शोधून कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

धुळे शहरातील महाले नगरात असणाऱ्या श्री मारुती मंदिरातील मूर्तीचा चांदीचा एक डोळा अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. यापूर्वी देखील या भागातील मंदिराच्या दानपेटीमध्ये आग लावण्याचा प्रयत्न घडला होता. मात्र कोणतीही तेढ होऊ नये, यासाठी परिसरातील नागरिकांनी सामंजस्यांनी प्रश्न मिटवला. मात्र, त्यानंतर मूर्तीचा एक डोळा चोरीला गेल्याने शिवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील, शहर समन्वयक संदीप सूर्यवंशी तसेच भरत मोरे, महादू गवळी, हिमांशू परदेशी आदींनी थेट पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांची भेट घेतली. तसेच्या हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. आगामी काळात नवरात्रोत्सव आणि अन्य धार्मिक उत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजकंटकांनी सामाजिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे अज्ञात समाजकंटकाला शोधून त्याच्यावर कठोर स्वरूपाची कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी तातडीने या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चांदीचा डोळा चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असून या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासणी सुरू झाली असून या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज देखील तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये तसेच सामाजिक शांतता अबाधित ठेवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा:

Back to top button