शरद पवारांनी आत्मचिंतन करावे : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा घणाघात | पुढारी

शरद पवारांनी आत्मचिंतन करावे : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा घणाघात

पुणे : पुढारी वृत्तसेवा  : राज्यात मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणते उद्योग आले? त्यामुळे विद्यमान सरकारवर टीका करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण त्यांच्या महविकास आघाडीच्या काळात राज्याची अधोगती झाली. सत्तेचा गैरवापर करणे हा एक कलमी कार्यक्रम अडीच वर्षात सुरू होता. जनताभिमुख कोणती कामे केली याच उत्तर शरद पवारांनी दिले पाहिजे. फक्त लोकांच्या समोर जाऊन नकारात्मक गोष्टी सांगून तुमची पापे झाकली जाणार नाहीत, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (दि.16) येथे केली.

पशुसंवर्धन आयुक्तालयात एका बैठकीसाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे अनेक प्रकल्प इच्छा असूनही राज्यात येऊ शकले नाहीत. सुरुवातीपासूनच तीन तिघाडी अशी अवस्था सरकारची होती. आता राज्यात सरकार बदलल्याने अनेक गुंतवणूकदार महाराष्ट्रात यायला तयार झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणं तस सांगितलेले आहे.
राज्यातील पालकमंत्री नियुक्त्या रखडल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, पुढील आठवड्यात राज्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होतील अशी माहिती आहे. मात्र, राज्य स्तरावर काही काम रडखलेले नाही. सर्व मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला नाही ही वस्तुस्थिती नाही, सगळ्यांनी कार्यभार स्वीकारला आहे.

आरोप असलेले नेते भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ होतात, प्रताप सरनाईक यांच्याबद्दल काय? या मुद्यावर ते म्हणाले,” मला त्या प्रकरणात काही माहिती नाही,मी लम्पी त्वचा आजाराबद्दल सांगू शकतो. ईडी सारख्या त्या त्या यंत्रणा त्यांचं काम करतात, त्या स्वतंत्र आहेत. त्या यंत्रणा कुणी प्रभावित करु शकत नाही. तो विषय माझ्या अखत्यारीत नाही आणि कुणाच्याच नाही. भाजपात येणारे पवित्र होतात यात  तथ्य नाही.

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे काय? यावर ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांची सुरक्षा अद्याप काढून घेण्यात आली नाही.  आता ते माजी मंत्री झाले आहेत. त्यांचं सरकार नाही हे ओळखून तरी आता सुरक्षा कवच घेऊन फिरू नये ते सोडून द्यावं. आधीच्या सगळ्या मंत्र्यांनी आता सुरक्षाकवच सोडून द्यावे. जनतेत जाण्यासाठी त्यांना भीती का वाटते असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या तीन महिन्यांत घेण्यात आलेल्या निर्णयांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या खात्यात काही गैर झालं असेल तर त्यात चौकशी करणे गैर काय? सगळ्याच माजी मंत्र्याच्या खात्याचा आढावा घेतला जातोय, असेही ते म्हणाले.

काँगेस छोडोचे चिंतन करा..
देशात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबद्दल छेडले असता ते म्हणाले. मुळात काँग्रेसच अस्तित्व कुठे दिसतंय का माहिती नाही. काँग्रेसचे मंत्री फक्त व्यक्तिगत फायद्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री मंडळात होते. काँग्रेस वाढवण्यासाठी त्यांनी काय केले ? राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढण्यापेक्षा लोक काँग्रेस सोडून चालले आहेत, त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वबदल लोकांना विश्वास वाटत नाही . त्यामुळे काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.  काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची माझ्याशी कोणतीही चर्चा होत नसल्याचेही ते म्हणाले.

प्रत्येक पक्षाची स्वत:ची एक कार्य पध्दती आहे. काँगेसनेसुद्धा भाजपच्या कार्यपद्धतीचा बोध घेण्याची गरज असल्याचा सल्लाही विखे पाटील यांनी दिला आहे.

Back to top button