प्रकल्प गेल्याने स्थानिकांची आर्थिक घडी विस्कटली, तरुणांमध्ये संताप | पुढारी

प्रकल्प गेल्याने स्थानिकांची आर्थिक घडी विस्कटली, तरुणांमध्ये संताप

तळेगाव दाभाडे : मावळातील तळेगाव एमआयडीसीमधून प्रस्तावित वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने तळेगाव परिसरामधील लघु उद्योजक, स्थानिक बेरोजगार तरुण, छोटे-मोठे व्यावसायिक, स्थानिक मालमत्ताधारक आदींनी संताप व्यक्त केला असून, त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे पुन्हा तळेगावात प्रकल्प सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

50 टक्के जमिनीचे भूसंपादन
तळेगाव एमआयडीसीमध्ये प्रस्तावित ‘वेदांता-फॉक्सकॉन’ प्रकल्प होणार होता. यासाठी मावळातील आबळे येथील जमीन निश्चित करून सुमारे 50 टक्के जमिनीचे भूसंपादनदेखील करण्यात आले होते.

हॉटेल्स व्यावसायिकांना फटका
या उद्योगामध्ये काम मिळणार या आशेवर बसलेले बेरोजगार तरुण, या उद्योगामध्ये काम करणार्‍या कामगारांची राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी केलेली बांधकामे, अधिकार्‍यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था व्हावी, यासाठी उभारण्यात येणारी हॉटेल्स यांना मोठा फटका बसला आहे.

स्थानिकांचा रोजगार गेला
तळेगाव दाभाडे परिसराच्या बाजूला तळेगाव एमआयडीसी, उर्से एमआयडीसी, चाकण एमआयडीसी, टाकवे एमआयडीसी, कार्ला एमआयडीसीसह अनेक लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त झाला आहे. छोटे-मोठे व्यवसाय, स्थानिक मालमत्ताधारक आदींनाही व्यवसायाची संधी काही प्रमाणात प्राप्त झाली आहे.

तरुणांकडून आंदोलन
किराणामाल व्यावसायिक, रिक्षा, कार भाड्याने देणारे तरुण यांचाही रोजगार हिरावला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने हजारो कामगार व व्यावसायिकांना वंचित रहावे लागणार आहे. तसेच, कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक तरुणांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्याने उदरनिर्वाहाचे साधन राहिले नाही. त्यामुळे हा प्रकल्प मावळात याच ठिकाणी राहावा, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे. ठिकठिकाणी तरुणांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

फॉक्सकॉन कंपनी काय आहे?
फॉक्सकॉन ही मूळ तैवानची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही फॉर्च्युन 500 च्या लिस्टमध्ये 22 नंबरची कंपनी आहे. फॉक्सकॉन ही जगातील सर्वांत मोठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान उत्पादन व सेवा निर्माण करणारी कंपनी आहे. फॉक्सकॉन ही मुख्यत्वे खूप जास्त विकल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करते. जसे अँपलसाठी आय-पॅड, आय-फोन, आय-पॉड, अमेझॉनसाठी किंडल, गेमिंग टर्मिनल, नोकिया चे फोन, सोनी चे प्ले स्टेशन्स, गूगलसाठी पिक्सेलचे फोन, ब्लॅकबेरीचा फोन, बहुतांश कॉम्पुटरमधील सीपीयू सॉकेट्स हे फॉक्सकॉनचे असतात. अंदाजे जगात वापरले जाणारे 50टक्क्यांपेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे फॉक्सकॉन शिवाय उत्पादित होऊ शकत नाहीत. फॉक्सकॉनचे आतापर्यंतचे मुख्य कामकाज हे तैवान व चीनमधल्या कंपन्यांमधून चालायचे. मागच्या काही वर्षांत निर्माण झालेल्या अमेरिका-चीन जिओ-पोलिटिकल वादाच्या परिणाम स्वरूप फॉक्सकॉन सारख्या अनेक कंपन्या पुढचा विस्तार चीनच्या बाहेर करण्यास उत्सुक आहेत. चीन-तैवानमध्ये असलेला तणाव ही बराच कारणीभूत आहे.

Back to top button